नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड
नागपुरातील सुप्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने सकाळी छापेमारी सुरू केली आहे. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे वकील व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळपासूनच उके यांच्या नागुपरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरु असून ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणात सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सूत्रांप्रमाणे भूखंड व्यवहारातील आर्थिक प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने ही धाड टाकल्याचे सांगण्यात येते.
ॲड. सतीश उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील असून त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. सतीश उके यांना हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखलं जातं.