शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 मार्च 2022 (08:09 IST)

नाशिककरांनो सावधान, येत्या २ एप्रिलपासून लागू होणार हा वाहतूक नियम

नाशिककरांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. शहराच्या वाहतूक व्यवस्थेच्यादृष्टीने पोलिस आयुक्तांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या २ एप्रिलपासून होणार आहे. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार, दुचाकीवरील दोघा व्यक्तींना आता हेल्मेट सक्तीचे असणार आहे. आतापर्यंत केवळ वाहनचालकालाच सक्ती होती. ती आता चालकासोबत असलेल्या व्यक्तीलाही होणार आहे.नाशिक शहरात सतत रस्ते अपघात होत असून त्यात मृत्यूमुखी पडणारे हे हेल्मेट परिधान न करणारे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. यासंदर्भात मोठी जनजागृती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करुनही त्याचा परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आता हेल्मेट सक्तीची मोहिम आणखी तीव्र करण्याचा निश्चय पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केला आहे. म्हणूनच येत्या २ एप्रिलपासून दुचाकीवरील दोघा व्यक्तींना हेल्मेट बंधनकारक असणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ५०० ते १ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
 
ज्या दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान केले आहे त्यांनाच पेट्रोल देण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र,अनेक पंपांवर हा नियम पाळला जात नाही. याचीही गंभीर दखल आयुक्तांनी घेतली आहे. म्हणूनच विनाहेल्मेट पेट्रोल दिल्याप्रकरणी आता पेट्रोल पंप चालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे.नाशिक शहरातील हेल्मेट सक्तीचा प्रश्न नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उपस्थित झाला होता. नाशिक परिक्षेत्रात वाहतूक पोलीसांकडून हेल्मेट सक्ती ही नियमानुसार करण्यात आली असल्याची माहिती, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. नाशिक परिक्षेत्रात वाहतूक पोलीसांकडून हेल्मेट सक्तीच्या नावाखाली दंड आकारणी होत असल्याबाबत विधानसभा सदस्य शांताराम मोरे व प्रकाश आबीटकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.याला उत्तर देताना गृह राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, व्दारका चौकात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीसांनी अवैध प्रवासी वाहतूकदारांकडून ६३ हजार ४०० रूपये दंड वसूल केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश सर्वच राज्यांना दिलेले होते. त्यानुसार वाहतूक पोलीसांनी नियमानुसारच कारवाई केली तसेच नाशिक मध्ये १८ जानेवारी ते ११ मार्च दरम्यान विनाहेल्मेट प्रवास करणा-या ८,४७२ लोकांकडून ४२ लाख ३६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे हा दंड नियमानुसारच केला आहे. अशी माहिती माहिती राज्यमंत्री श्री. देसाई यांनी विधानसभेत दिली होती. यावेळी तालिका अध्यक्ष संजय शिरसाठ यांनीही हेल्मेटसक्ती आणि नियमबाह्य दंडआकारणी याबद्दल गृह विभागाने आलेल्या तक्रारींदेखील तपासून पहाव्या अशा सूचना केल्या आहेत.