सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (20:22 IST)

अल्पवयीन मुलांनी रस्त्यांवर वाहन चालविल्यास पालकांवर होणार कारवाई

bike drive fine
नाशिक : अल्पवयीन मुलांकडून रस्त्यांवर वाहने चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे १८ वर्षाखालील मुलांना विनापरवाना वाहन चालविण्यास पालकांनी परवानगी देवू नये, अन्यथा पालकांना शिक्षा व दंडात्मक करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
मोटार वाहन कायद्यांतर्गत १६ वर्षाखालील मुलांनी वाहन चालविण्याचा गुन्हा केला. गुन्ह्यामध्ये दोषी आढळणाऱ्या मुलांच्या पालकांना तीन वर्ष कारावास व २५ हजार रूपये दंडाची तरतुद करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे वाहन चालविण्याचा परवाना नसतांना वाहन चालविल्यास चालकास रूपये ५ हजार व वाहन मालकास ५ हजार असा एकूण १० हजार रूपये दंड व शिक्षेची तरतुद मोटर वाहन कायद्यात करण्यात आली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने याबाबत वायुवेग पथकामार्फत जिल्हा व शहरात जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
१८ वर्षाखालील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे त्यांना वाहन चालविण्याची परवानगी देण्यात येवू नये, असे प्रबोधन प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयात जाऊन करीत आहेत. तरी पालकांनी याची गांर्भीयाने दखल घ्यावी, असे आवाहनही प्रदिप शिंदे यांनी केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor