1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राहुरी: तरुणावर बिबट्याचा हल्ला

maharashtra news
अहमदनगर -राहुरी तालुक्‍यातील चिंचोली गंगापूर व परिसरात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. गंगापूर शिवारात रात्रीच्या वेळी वीजपंप चालू करण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला. परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक शेळ्यादेखील बिबट्याने फस्त केल्याने मोठी दहशत पसरली आहे.
 
गंगापूर गावच्या वर्पे वस्तीवरील इंद्रभान वर्पे हा तरुण सायंकाळच्या वेळी आपल्या शेतातील विद्युतपंप सुरू करण्यासाठी जात असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक अंगावर झेप घेतली. परंतु, या तरुणाने प्रसंगावधान राखत जोरदार आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली.मात्र, या तरुणाच्या पाठीवर बिबट्याचा पंजा लागल्याने तो जखमी झाला. 
 
चिंचोली शिवारात बबन मुरलीधर भोसले यांचाही बोकड बिबट्याने फस्त केला. वनविभागाचे कर्मचारी पठाण व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या भागातून शेतकऱ्यांची पाळीव कुत्रीही बिबट्याने फस्त केली आहेत. 
 
देवळाली रस्त्यालगत असणाऱ्या उसाच्या शेतात या बिबट्यांचा वावर असून, बिबट्यांसमवेत पिले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. वनविभागाने या परिसरात तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.