बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मे 2022 (21:11 IST)

अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला, 'संसार उभे करायला अक्कल लागते, धुडगूस घालायला नाही'

ajit panwar
"आम्ही राज्यभर सभा घेतो. दिवसभर, उन्हातान्हात सभा सुरू असतात. यांची सभा दिवस मावळल्यावर, हवा सुटल्यावर. कधी दुपारी सभा घेतली आहे का? लोकांची दिशाभूल करण्याचं काम करायचं", अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
 
यांनी कधी कष्ट घेतलेत? लोकांना बनवण्याचं काम करत आहेत. तुमच्या माझ्या महाराष्ट्राला परवडणारं नाही. राजकारण विचित्र दिशेने जात आहे, असं पवार म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "धुडगूस घालायला अक्कल लागत नाही. कशाकरता वातावरण बिघडवण्याचं काम. सिलेंडर, पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्येबद्दल बोलले का? उन्हाच्या लाटेबद्दल काही सांगितलं का?"
 
"लोकांच्या मनात विष कालवण्याचं काम होतं आहे. या व्यक्तीने कधी साखर कारखाना उभा केला आहे का? कधी सूतगिरणी उभी केली आहे का? कुठली शिक्षणसंस्था उभी केली आहे का? काय काम केलं यांनी? असा सवाल अजित पवार यांनी केला.
 
"समजा तुम्ही काही उभारलं नाही. पण जे असं काम करत आहेत त्यांना तरी तुम्ही मदत केली आहे का? कधी शब्द खर्ची केला का? काही व्हिजन दाखवलं? पठ्यानं सोसायटी काढली नाही. दूध सोसायटी नाही, टरबूज-खरबूज सोसायटी नाही. कापूस सोसायटी नाही. मजूर सोसायटी नाही. सोसायट्या तर त्यांना कळतच नसतील. उचलली जीभ, लावली टाळ्याला", असा प्रकार आहे.
 
"माणसांचे संसार उभं करायला अक्कल लागते. धुडगूस घालायला, मोडतोड करायला अक्कल लागत नाही. आपण वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतो. कुठे अडचण आहे? सारखं नाव सांगतात- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींनी असं केलं, तसं केलं. त्यांनी भोंगे बंद केले. पण त्यांनी फक्त मशिदीवरचे भोंगे बंद केले नाहीत. मंदिरावचे लाऊडस्पीकर बंद झाले आहेत. साईबाबांचं मंदिर आहे. काकडआरती पहाटे 5 वाजता असते. सर्वोच्च न्यायालयाने माईक 6 वाजता सुरू करायला सांगितलं आहे. त्यासंदर्भात कुणी आक्षेप घेतला नाही", असं पवार म्हणाले.
 
"रात्रीचं जागरण, गोंधळ किती वाजता असतो? उद्या फतवा काढायचं म्हटलं तर जागरण, गोंधळ बंद करायला लागेल. हरिनाम सप्ताह आपल्याकडे असतो. ग्रामीण भागात उरुस, जत्रा सुरू आहेत. लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात. विरंगुळा मिळतो. हे कार्यक्रम रात्रीचेच होतात. कार्यक्रम नियमानुसार होत असेल तर पोलीस उठसूट हस्तक्षेप करत नाहीत. जोपर्यंत संमतीने चाललेलं असतं तोपर्यंत आपण डोळेझाक करतो. करतो की नाही? वातावरण खराब करण्याचं काम करतात."
 
"समाजात तेढ माजवण्याचं काम जाणीवपूर्वक करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर यांनी राजकीय दुकानांसाठी केला. हीच मंडळी शरद पवारांसंदर्भात विचारत आहेत- तुम्ही छत्रपतींचं नाव का घेत नाहीत? शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं फक्त नाव घेतात असं नाही तर त्यांच्या विचारांचं कृतीतून आचरण करतात. महामानवांचं काम समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम ही माणसं करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या रक्तात आहेत. श्वासात-ध्यासात-नसानसात आहे." "छत्रपती शिवाजी महाराज यांना समजलेच नाहीत. यापुढेही त्यांना ते समजणार नाहीत. यांचं बोलणं म्हणजे नौटंकी आहे. भाषण म्हणजे यांची नक्कल कर. भुजबळ साहेबांची नक्कल कर. माझी नक्कल कर. जयंत पाटलांची नक्कल कर हे सुरू असतं. नकलाकार आहेत का भाषण करायला आहेत? बोलत असताना तारतम्य बाळगायला लागतं. आमच्याकडून एखादा शब्द चुकीचा निघाला तर आम्ही माफी मागतो. ही आपली पद्धत आहे. यांनी मात्र सगळं सोडून द्यायचं. वातावरण गढूळ करायचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं याचा विचार करायला पाहिजे," असा टोलाही राज ठाकरे यांना अजित पवार यांनी हाणला आहे.