रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास,चौकशीला पूर्ण सहकार्य करणार : अजित पवार

न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असून यापुढेही चौकशीला मी पूर्ण सहकार्य करीत रहीन, असे  तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार त्यांनी म्हटले आहे.  सिंचन घोटाळ्याला पवारच जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  
 
अधिवेशनासाठी विधानसभेत हजेरी लावण्यापूर्वी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, हे प्रकरण सध्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे माझ्या बोलण्याने याच्या तपासणी प्रक्रियेत बाधा येऊ नये याची मी काळजी घेत आहे. तशा सूचना माझ्या वकिलांनी मला केल्याने मला यावर जास्त बालोयचे नाही. या प्रकरणी वेळोवेळी चौकशीला बोलावलं तेव्हा मी गेलो आहे. यापुढेही चौकशीला पूर्ण सहकार्य करीत राहीन. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे.
 
सिंचन प्रकरणी तत्कालीन विरोधकांनी माझ्यावर विविध आरोप केले, त्यावर मी सरकारमध्ये असतानाही वारंवार स्पष्टीकरण दिले होते. तसेच यावर श्वेतपत्रिकाही काढण्यात आली होती. मात्र, तरीही अद्याप माझ्यावर आरोप होत आहेत. सरकार त्यांच काम करतंय असं वाटतंय, असेही अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.