1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2023 (19:09 IST)

अजित पवार 10 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री होतील – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chauhan
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या 10 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री होतील, असा अंदाज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलाय. ते बीबीसी मराठीशी बोलत होते.
 
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा गेल्या एक-दोन आठवड्यात जोर धरू लागलीय. आधी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीचे नेते सलीम सारंग यांनी लावलेल्या बॅनरमुळे, तर नंतर वाढदिवसाच्या सदिच्छा देताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्वीटमुळे अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा राजकीय वर्तुळात जोरानं सुरू झाली.
 
त्यातच आता पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय आणि आधीपासूनच सुरू असलेल्या चर्चांना आणखीच उधाण आलंय.
 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मी माझ्याकडे असणाऱ्या माहितीच्या आधारावर एक राजकीय विश्लेषक म्हणून हे वक्तव्य केलेलं होतं. याबाबत माझं आकलन आजही असं आहे की, अतिशय महत्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीला समोर ठेवून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी एक निर्णय केलेला आहे.
 
“ज्यानुसार त्यांना असं वाटत की सध्या मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे काही महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचा प्रभाव पाडू शकलेले नाहीत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला लोकसभा निवडणुकांना सामोरं जाता येणार नाही. त्यामुळे आता अजित पवारांना भाजपने सोबत घेतलेलंच आहे तर त्यांना आता ती जबाबदारी द्यावी.
 
“विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता जेव्हा एकनाथ शिंदे आणि सोळा आमदारांच्या पक्षांतराबाबत जेंव्हा निर्णय देतील, जो निर्णय 10 ऑगस्टपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंचं निलंबन होईल आणि मग त्यानंतर जे पद रिक्त होईल तिथे काही व्यवस्था केली जाण्याची शक्यता आहे. कदाचित त्याआधीही हा निर्णय होऊ शकतो असं माझं आकलन आहे.”
 
यावेळी पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्रिपद रिक्त झाल्यावर अजित पवारांना एकनाथ शिंदेंच्या जागी मुख्यमंत्री केलं जाईल. कारण महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची भाजपला गरज आहे.
 
“नरेंद्र मोदींची जी स्टाईल आहे 'वापरा आणि फेकून द्या' अगदी त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंची उपयुक्तता आता संपलेली आहे आणि आता पुढे कुणाची उपयुक्तता संपते ते पाहणं महत्वाचं असणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याकरता एकनाथ शिंदेंच्या जागी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.”
 
पृथ्वीराज चव्हाण हल्ली संजय राऊतांना भेटून आलेत वाटतं - देसाई
पृथ्वीराज चव्हाणांच्या या अंदाजावर शिंदे गटातील शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, “पृथ्वीराज चव्हाण हल्ली संजय राऊत यांना भेटून आलेत वाटतं. त्यांना आधीच कसं माहिती आमदार अपात्र होणार आहेत? ही कायदेशीर प्रक्रिया आहे.”
 
2024 पर्यंत एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, असं म्हणताना शंभुराज देसाई पुढे म्हणाले की, “ट्वीट करून कोणी मुख्यमंत्री होत नसतं. ज्यांनी ट्वीट केलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की अनावधानाने ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री बनायला 145 + आमदार आवश्यक असतात असंच मुख्यमंत्री बनता येत नाही.”
 
“राष्ट्रवादीचे नेतेही बोलतायत, पण बोलता तर आम्हालाही येतं. पण आम्हाला आमच्या नेत्याचे आदेश आहेत नाहीतर आम्हीही बोलू शकतो,” असंही शंभुराज देसाई म्हणाले.
 
त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण जी पतंगबाजी करत आहेत त्याला काही अर्थ नाही. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील.”