1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 22 जुलै 2023 (21:01 IST)

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय : इर्शाळवाडीमधील मुलांच्या आयुष्यातील अंधार दूर होणार ; शिंदे फाउंडेशन उचलणार खर्च

eknath shinde
Chief Ministers big decision इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप १०० जण बेपत्ता आहेत. आज सकाळ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य थांबवले आहे. दरम्यान, या घटनेत अनाथ झालेल्या २२ मुलांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदे फाऊंडेशन पुढे आले आहे. या घटनेत अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वीकारले आहे.
 
मुख्यमंत्री शिंदे यांनी या बाबत ट्विट करत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये शिंदे यांनी लिहिले आहे की, ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.
 
शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे.
 
हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे.