शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (08:46 IST)

राज्यातील सर्व शाळांनी बंद पुकारावा, आमदार विक्रम काळे यांचे आवाहन

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं शाळेतील शिपाई पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात आज राज्यातील सर्व शाळांनी बंद पुकारावा असं आवाहन मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केलंय. कंत्राटी शिपाई नेमल्यास अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे राज्यातील 52 हजार शिपायांच्या नोकरीवर गंडांतर आणणारा हा निर्णय रद्द करावा अशी मागणी आमदार काळे यांनी केली आहे.
 
शाळेत मुली असतात, तसेच संगणकांसह अनेक वस्तू असतात अशावेळी कंत्राटी शिपाई नेमल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतील. त्यामुळे राज्य सरकारनं शाळेतील शिपायांची पदं रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी  राज्यातील शाळांनी बंद पाळावा असं आवाहन विक्रम काळे यांनी केलं आहे. विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरुद्ध स्वपक्षीय आमदाराकडूनच शाळा बंद पाळण्याचं आवाहन केलं जात आहे.
 
सरकारने 11 डिसेंबर 2020 रोजी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसंदर्भात काढलेल्या शासन निर्णयाविरोधात उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून जाहीर निषेध नोंदवावा असं आवाहन उस्मानाबाद जिल्हा खासगी शिक्षण संस्थाचालक संघानेही केलं आहे.