सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (09:15 IST)

अमळनेर : विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ‘नली’ नाटकाचा प्रयोग

Natak
अमळनेर : येथील विद्रोहीच्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी, २ फेब्रुवारी रोजी जळगावच्या परिवर्तन संस्था निर्मित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित श्रीकांत देशमुख लिखित नाट्य रूपांतर ‘नली’ नाट्य प्रयोग सायंकाळी ७ वाजता विद्रोहीच्या मंचावर आयोजित केला आहे. महाराष्ट्र, गोवा, बंगलोर व मध्यप्रदेशात ‘नली’चे ८६ प्रयोग झालेले आहेत.
 
जळगावच्या परिवर्तन संस्थेने नाट्य प्रयोगाची निर्मिती केली आहे. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित श्रीकांत देशमुख यांच्या नलिनी देवराव व्यक्तिचित्राचे नाट्य रूपांतर म्हणजे ‘नली’ एकलनाट्य आहे. नाट्यप्रयोगात अबोध मनातील प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या समोर येत असतांना गावखेड्यातल्या महिलांचे जगणे, ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्‍न, जातीव्यवस्थेतील महिलांचे स्थान, गावगाड्यातील सामाजिक संरचना तसेच खेड्यातली कुटुंबव्यवस्था, शिक्षण आणि शेती संस्कृतीतील अनेक प्रश्‍नांवर एकलनाट्य भाष्य करते.

मूळ लेखक श्रीकांत देशमुख तर नाट्य रूपांतर शंभू पाटील यांनी केले आहे. कलावंत हर्षल पाटील प्रमुख भूमिका सकारतील. दिग्दर्शक योगेश पाटील, पार्श्‍वसंगीत मंगेश कुलकर्णी, प्रकाश योजना अक्षय नेहे, वेशभूषा मंजुषा भिडे यांची तर कविता वाचक स्वर नयना पाटकर यांचा असेल. निर्मिती प्रमुख पुरुषोत्तम चौधरी, नारायण बाविस्कर आहेत.
 
महाराष्ट्रभर गाजणारा हा एकल नाट्य प्रयोग अमळनेरकरांसाठी व साहित्य नगरीत येणाऱ्या रसिकांना एक वेगळी पर्वणी ठरणार आहे. नाट्य पर्वणीचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष श्‍याम पाटील, मुख्य संयोजक प्रा.लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक प्रा.अशोक पवार, निमंत्रक रणजित शिंदे यांच्यासह संयोजन समितीचे कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, समन्वयक करीम सालार, संयोजक डॉ.मिलिंद बागुल, अविनाश पाटील, लीना राम पवार, प्रशांत निकम, स्थानिक समिती अध्यक्ष गौतम मोरे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे आदींनी केले आहे.

Edited By -  Ratnadeep ranshoor