गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 9 डिसेंबर 2019 (10:38 IST)

बाळासाहेबांच्या स्मारकावरून अमृता फडणवीसांचं टीकास्त्र

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी औरंगाबादमध्ये एक हजार झाडं तोडली जाणार असल्याचं वृत्त अनेक ठिकाणी आल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारवर टीका सुरू झाली.
 
मुंबई मेट्रोच्या आरे कारशेडसाठीच्या वृक्षतोडीविरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर भाजप नेतेच नव्हे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही आक्रमक झाल्या. "जेव्हा तुम्हाला कमिशन मिळतं, तेव्हा तुम्हाला झाडं तोडलेली चालतात. या पापाला क्षमा नाही. गेट वेल सून, शिवसेना," असं खोचक ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं.
 
मात्र, त्या ट्वीटला शिवसेना प्रवकत्या प्रियंका चतुर्वेदींनी उत्तर दिलं. "सॉरी, तुमचा अपेक्षाभंग झाला. पण एकही झाड कापलं जाणार नाही, हे सत्य आहे. महापौरांनीही याला दुजोरा दिला आहे. रेटून खोटं बोलणं हा मोठा रोग आहे. गेट वेल सून."
 
मात्र, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडणार नसल्याचं औरंगाबादचे शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्पष्ट केलंय.
 
"एक विषय काही दिवसांपासून चर्चेला येत आहे की, झाडं तोडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवणार आहोत. मात्र महापौर म्हणून माझा खुलासा आहे की, एकही झाड न तोडता हे स्मारक कसं होईल त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. स्वत: उद्धव ठाकरे यांनीच वृक्षतोड न करता स्मारक करण्यास सांगितलं होतं," असं औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितलं.