रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 डिसेंबर 2023 (20:33 IST)

राम कलश पूजनाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीकडून रोखण्याचा प्रयत्न

prakash ambedkar
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राम कलश पूजनाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रोखण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान हा कार्यक्रम संपल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्रोश व्यक्त केला.
 
आयोध्यातील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी सर्वत्र राम कलशाचे पूजन केले जात आहे. या कार्यक्रमानंतर एक आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते आणि राम मंदिराला या अक्षदा पाठविण्यात येत आहे. असेच अक्षदा कलशाचे पूजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आले होते .
 
ज्या कार्यक्रमाला विद्यापीठाचीही संमती होती आणि हा कार्यक्रम घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांची देखील मागणी असल्याने हा कार्यक्रम मुक्त विद्यापीठाच्या आवारामध्ये आयोजित करण्यात आला होता. याबाबतचे परिपत्रक देखील विद्यापीठाने प्रसिध्द करून अतिशय मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम व्हावा, या कार्यक्रमाला विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी यांना सहभाग घेता यावा यासाठी विद्यापीठाने स्वतःहून प्रयत्न केले होते असे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकावरून समोर येत आहे.
 
 राम कलश पूजनाचा कार्यक्रम ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की हा कार्यक्रम विद्यापीठाच्या आवारात होऊ नये, ही चुकीची पद्धत आहे. 
 
विद्यार्थ्यांची मागणी आणि विद्यापीठाची तयारी यामुळेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने हा कार्यक्रम तिथे घेण्यात आला. आम्हाला अन्य ठिकाणी देखील मागणी होती, अनेक संस्थांची राम कलश पूजनाची तयारी होती परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीमुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी झाला. काहींनी हा कार्यक्रम थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यापूर्वीच आमचा कार्यक्रम संपन्न झाला होता, असे अभाविप चे महानगर मंत्री ओम मालुंजकर यांनी सांगितले.


Edited by -Ratnadeep Ranshoor