मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (21:09 IST)

संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण महापुरुषांचा अपमान प्रकरणानंतर त्यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विरोध असतानाही आणि परवानगीशिवाय रॅली आयोजित केल्यामुळे त्यांच्यासह 150 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान या प्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांचादेखील समावेश आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पुणे-अहमदनगर रस्त्यावरील मांजरी कोळवाडी परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संघटितांनी स्थानिक पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता, पण परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी परवानगी नाकारली असतानाही रॅली काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी स्वत: कारवाई करत लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
 
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे पुण्यात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. यापूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा दाखला देत अनेक संघटनांनी कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. पुण्यात घटना घडू देऊ नका, अशी विनंती करण्यासाठी अनेक संघटनांनी शहरात आंदोलनही केले होते. या कार्यक्रमापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने हा कार्यक्रम घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचा या कार्यक्रमाला तीव्र विरोध होता.
 
संभाजी भिडे यांनी यापूर्वी महापुरुषांच्या बाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य तसेच भीमा कोरेगाव 2018 सालची दंगल यामध्ये मुख्य आरोपी म्हणून त्यांचे नाव पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तसेच संभाजी ब्रिगेड, OBC Welfare Foundation, भीम आर्मी, समता परिषद, मास मूव्हमेंट, आनंदी प्रतिष्ठान, यंग पृथ्वी फाऊंडेशन आणि इतर समविचारी संघटनांचा या होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध केला होता.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor