रिसॉर्ट तोडण्यासाठी हातोडा घेऊन निघालेल्या सोमय्यांना अनिल परबांचं खुलं आव्हान
"किरीट सोमय्या माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार आहे. रिसॉर्ट तोडायला किरीट सोमय्या कर्मचारी आहेत काय? हिंमत असेल तर तोडून दाखवा," अशा शब्दांत, दापोलीतील रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेल्या किरीट सोमय्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी थेट आव्हान दिलं आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी थेट रिसॉर्ट तोडण्याचं म्हणत थेट दापोलीच्या दिशेने निघाले. प्रतिकात्मक हातोडा घेऊन सोमय्या निघाले होते. त्यांच्यासोबत शेकडोच्या संख्येत भाजपचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. यावेळी राज्याचे परिवहन मंत्रीअनिल परब यांनी सोमय्यांना खुलं आव्हान दिलं.
परब म्हणाले, "हा रिसॉर्ट माझा नाहीये. ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. किरीट सोमयया पालिकेचे नोकर आहेत का...? किरीट सोमय्या वातावरण खराब करत आहेत. जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत. त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे. मी पुन्हा आता हायकोर्टात जाणार आहे कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम सुरू आहे."