शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (21:35 IST)

सिव्हिलमधील ऑक्सिजन प्लॅटवर चोरट्यांचा डल्ला !

अहमदनगर  जिल्हा शासकीय रूग्णालयातील सेंट्रल ऑक्सिजनची लाईनचे चोरट्यांनी नुकसान करून ऑक्सिजन पुरवठा करण्याकरीता असणारे साहित्य चोरून नेले.यामुळे काही काळासाठी जिल्हा रूग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान या प्रकरणी शुक्रवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा प्रल्हाद उंदरे (वय 40 रा. सिव्हील हाडको, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान यामुळे जिल्हा रूग्णालयातील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
 
गुरूवारी दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत डॉ. उंदरे यांची सीएमओ ड्युटी होती. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ट्रामा वार्ड नंबर 12 च्या प्रमुख सिस्टर लकडे यांनी डॉ.उंदरे यांना सांगितले की, पावणे आठ ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने ट्रामा वार्डच्या पाठीमागील बाजूस असलेले सेंट्रल ऑक्सिजन लाईन तोडली आहे.
 
यामुळे पूर्ण ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला आहे. त्यावेळी डॉ. उंदरे व लकडे यांनी खात्री केली असता ऑक्सिजन पुरवठा करण्याकरीता असलेले साहित्य मनिफोल्ड, रेग्यलेंटर, रिटनिंग वॉल चोरीला गेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आली. यानंंतर शुक्रवारी रात्री तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.