अण्णा हजारे यांचे दोन दिवसात दीड किलो वजन घटले
लोकपाल कायद्याची अंमलबजावणीसाठी बुधवारपासून अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले असून वजन पहिल्या दोन दिवसातच दीड किलोने घटले आहे. वयामुळे अण्णांचा रक्तदाबही अनियमित असल्याने त्यांनी जास्त काळ उपोषण करणे धोक्याचे आहे, असा सल्ला डॉक्टरांच्या पथकाने गुरुवारी दिला. अण्णा मात्र उपोषणावर ठाम आहेत. पहिल्या दोन दिवसात अण्णांशी सरकारकडून कुणीही संपर्क केलेला नाही. जिल्ह्यातील स्थानिक प्रशासकीय अधिकारीही राळेगणकडे फिरकलेले नाहीत.
दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन हे अण्णांच्या आंदोलनात शिष्टाई करत होते. मात्र, दिल्लीबाबत काहीच निर्णय घेऊ शकत नसल्याने त्यांना शिष्टाईसाठी येण्यासही अण्णांनी व गावकऱ्यांनी नकार दिला. अण्णांचे दोन दिवसातच १ किलो ७०० ग्रॅम वजन घटले आहे. अण्णा सध्या ८१ वर्षांचे आहेत. अण्णांनी तीन दिवसांपेक्षा अधिक काळ उपोषण केल्यास त्यांच्या अवयवांना गंभीर धोका पोहोचू शकतो, असे डॉ. पोटे यांनी सांगितले. अण्णांना मौन पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण बोलण्यानेही त्यांच्यातील शक्ती कमी होत आहे.