शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (22:02 IST)

नाशिक-पुणे महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

accident
नाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात झाला आहे. सिन्नर तालुक्यातील मोहदरी घाटात दोन ते तीन कारमध्ये हा अपघात झाला असून त्यात ५ जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला.
 
नाशिक-पुणे महामार्गावर काल एसटी महामंडळाच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने ही बस दुचाकी, कार आणि एका एसटी बसवर धडकली. त्यानंतर या बसने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत २ जणांचा बळी गेला. ही घटना ताजी असतानाच आत नाशिक-पुणे महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ हा अपघात झाला आहे. संगमेनरकडून नाशिककडे स्विफ्ट डिझायर कार येत होती.  मात्र, या कारचा टायर अचानक फुटला. त्यावेळी कार भरधाव वेगात होती. त्यामुळेच ही कार अनियंत्रित झाली. परिणामी, डिव्हायर तोडून ही कार थेट पलिकडच्या रस्त्यावर गेली. यावेळी कारने समोरुन येणाऱ्या काही वाहनांना जोरदार धडक दिली. इनोव्हासह काही कारला ही जबर धडक बसली. या अपघातात स्विफ्ट कारमधील ५ जण ठार झाले आहेत. त्यात दोन युवक आणि तीन युवतींचा समावेश आहे. हे पाचही केटीएचएम कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे सांगितले जाते. तसेच, हे सर्व विद्यार्थी नाशिक शहरातील सिडको परिसरातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. हे सर्वजण विवाहासाठी गेले होते.
 
हा अपघात एवढा भीषण होता की क्षाणार्धात मोठा आवाज झाला आणि कार एकमेकावर आदळल्या. अपघात होताच महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तातडीने काही जणांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने सिन्नरच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या अपघातात वाहनांचा चेंदामेंदा झाला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याचे काम सुरू आहे. इनोव्हा कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत.  मृत विद्यार्थ्यांमध्ये हरीश बोडके, मयुरी पाटील, शुभम ताडगे (अन्य दोन मृतांची ओळख पटणे बाकी आहे) यांचा समावेश आहे. तर, गायत्री फड, साक्षी घाळा, साहिल वरके, सुनिल दत्तात्रय दळवी आणि अन्य काही जण जखमी आहेत. दरम्यान, जखमींमधील काही जणांची प्रकृती चिंतानजक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.

Edited By- Ratnadeep Ranshoor