शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (08:41 IST)

मराठा आरक्षण द्यायचं की नाही ते अशोक चव्हाणांनी स्पष्ट करावे : चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना जाहीर आव्हान दिलं आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही ते अशोक चव्हाणांनी स्पष्ट सांगावं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नाही, त्यामुळे मराठा समाजाचं अस्तित्वात असलेले आरक्षण गेलं. पण, अशोक चव्हाणांकडून सातत्यानं मराठा आरक्षणाबाबत नवे मुद्दे काढून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. आता घटनादुरुस्तीनंतर राज्याला पूर्ण अधिकार मिळाल्यानंतर ते पन्नास टक्क्यांच्या मुद्द्यावर अडून बसलं आहेत. पण तुमच्या सरकारला मराठा समाजाला खरोखरीच आरक्षण द्यायचं आहे का नाही, ते तरी आता स्पष्ट सांगा, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
 
पाटील पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करताना १०२ व्या घटनादुरुस्तीबाबत जो अर्थ लावला त्यामुळे एखाद्या जातीला मागास ठरविण्याचा अधिकार राज्यांना नाही तर केंद्राला आहे असं चित्र निर्माण झालं. त्याबाबत केंद्र सरकारनं राज्यांना अधिकार आहे असं स्पष्ट करणारी घटनादुरुस्ती केली. आता राज्याकडे अधिकार आला आहे. तेव्हा महाविकास आघाडी सरकार नव्या जोमाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काम सुरू करेल असं वाटत होतं. परंतु, हे सरकार काही तरी करून आरक्षण टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, असंही ते म्हणाले.