रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2023 (20:52 IST)

अश्वजीत गायकवाडचा एक दिवसांत जामीन मंजूर

ashwajeet priya
इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर प्रिया सिंह हिला मारहाण करुन तिच्यावर SUV कार चालवण्याचा आरोप असलेला अश्वजीत गायकवाड याला एक दिवसांत जामीन मंजूर झाला आहे. रविवारी रात्री अश्वजीत गायकवाडसह त्याच्या मित्रांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी त्यांना कोर्टात सादर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावरुन विरोधी पक्षाने गृह विभागावर टीका केली आहे. राज्यात महिलांच्या जीवावार उठणाऱ्यांना मोकळीक मिळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे.
 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक  अनिल गायकवाड  यांचा मुलगा अश्वजित गायकवाड  याच्यावर प्रेयसी तसेच सोशल मीडिया इन्फ्लोएन्सर प्रिया सिंह  हिला मारहाण करत गाडीने उडवल्याचा आरोप आहे. 11 डिसेंबरच्या रात्री घोडबंदर रोडवर ही घटना घडली होती.
 
ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या दबावाखाली तक्रार नोंदवण्यास नकार देणार्‍या ठाणे पोलिसांनी अखेर अश्वजित गायकवाडसह रोमिल पाटील आणि सागर शेडगे या तिघांना रविवारी रात्री अटक केली. सोबतच दोन चार चाकी वाहने जप्त केली. प्रिया सिंहने आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी करत सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर सोशल मीडियातूनही अश्वजितला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला होता.

रविवारी अश्वजीत, पाटील, शेडगे यांना भारतीय दंड संहिता 323 (विशिष्ट उद्देशाने बेदम मारहाण), 279 (बेदरकार वाहन चालवणे) आणि 504 (विशिष्ट हेतूने जाणीवपूर्वक अपमान करणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणे) या कलमांखाली कासारवडवली पोलिसांनी अटक केली होती.
 
या तिघांना सुरुवातीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले, त्यानंतर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पी. एस. धुमाळ यांच्या न्यायालाने जामीन मंजूर केला आहे. आरोपींचे वकील बाबा शेख म्हणाले, माझ्या अशीलांवर लावण्यात आलेली सर्व कलमे ही जामीनपात्र आहेत, त्यामुळे चौकशीसाठी त्यांच्या कोठडीची गरज नाही.
 
घोडबंदर येथील वाघबीळ भागात प्रिया राहत असून ती सलूनचा व्यवसाय करते. प्रिया आणि अश्वजित यांच्यात जवळपास 4 वर्षे संबंध असल्याचे सांगितले जाते. प्रियावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी स्वाक्षरीसाठी दबाव टाकल्याचा आरोप तिने केला आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला असल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. 

Edited by -Ratnadeep Ranshoor