रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2023 (19:57 IST)

सुधाकर बडगुजर : सलीम कुत्तासोबत डान्स केल्याच्या आरोपाचं प्रकरण काय आहे?

sudhakar badgujar
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होऊ लागलीय.बडगुजर यांच्यावर आधी सलीम कुत्ता या गुन्हेगारासोबत डान्स करत असल्याचा आरोप झाला आणि आता 10 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाकडून गुन्हा दाखल झाला आहे.
 
सुधाकर बडगुजर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नाशिक महानगर प्रमुख आहेत.
 
सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली असली, तरी नागपुरात पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सुधाकर बडगुजर यांच्याशी संबंधित प्रकरण गाजत आहे.
 
सलीम कुत्ता प्रकरण आणि एसीबीनं दाखल केलेला गुन्हा अशा दोन्ही प्रकरणांची आपण एक-एक करून सविस्तर माहिती घेऊ.
 
सलीम कुत्तासोबत डान्स केल्याच्या आरोपाचं प्रकरण काय आहे?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सलीम कुत्ता याच्यासोबत सुधाकर बडगुजर डान्स करत असल्याचा फोटो दाखवत भाजप आमदार नितेश राणे यांनी कारवाईची मागणी केली.
 
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, असं जाहीर केलं.
 
यावर सुधाकर बडगुजर म्हणाले की, “सभागृहात माझ्यावर आरोप करण्यात आले, पण त्यांनी योग्य माहिती घेतली नाही. 2016 साली विजया रहाटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भाची मागणी करणारी सभा झाली, त्यावेळी शिवसेनेने आंदोलन केलं, त्यात अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले गेले, तेव्हा मीही 15 दिवस जेलमध्ये होतो. त्यावेळी काही आरोपी जेलमध्ये होते, तिथं कोणते आरोपी होते, याबद्दल मला माहितही.
 
“पण एक निश्चित की, राजकारणात येण्याआधीपासून माझ्यावर एनसीही दाखल नव्हती. माझ्यावर ज्या केस आहेत, त्या राजकीय आंदोलनांमधून दाखल झालेल्या आहेत.”
तसंच, सुधाकर बडगुजर पुढे म्हणाले की, “गुन्हेगार जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा? तो पॅरोलवर आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात वावरू शकतो, अशावेळी सार्वजनिक कार्यक्रमात कधी आमची भेट झाली असेल, तर माहिती नाही.
 
मॉर्फिंगही असू शकतं. पण सलीम कुत्ता वगैरे व्यक्तीशी माझे कधीही संबंध नव्हते, मी सेंट्रल जेलला 14 दिवस होतो, त्यावेळी ते तिथे कैदी होते,” असा दावा बडगुजर यांनी केला.
 
दुसरीकडे, विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून चौकशी सूरू होण्यापूर्वीच नाशिक पोलिसांनी गुन्हे शाखेच्या माध्यमातून चौकशी सुरू केली. पहिल्या दिवशी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः बडगुजरांची चौकशी केली, नंतर सलग तीन दिवसापासून चौकशी सुरू आहे.
 
नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक पुण्यातील येरवडा कारागृहात जाऊन सलीम कुत्ता याचा घेणार जबाब घेणार आहे. नाशिक पोलिसांचा नाशिक मध्यवर्ती कारागृहासोबत तसा पत्र व्यवहार केला आहे.
 
दरम्यान, हे प्रकरण विधानसभेत असल्याने नाशिक पोलीस आयुक्तांनी यावर सविस्तर बोलण्यास नकार दिला.
 
एकीकडे हा तपास सुरू असतानाच, दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
 
लाचलुचपतचं प्रकरण काय आहे?
नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक असताना सुधाकर बडगुजर यांच्या ‘बडगुजर आणि कंपनी’ या कंपनीला ठेका दिला गेला होता. नाशिक महापालिकेत नगरसेवकपद भूषवताना स्वत:च्या कंपनीला काम देऊन पदाचा गैरवापर केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केली.
 
2014 साली तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी तक्रार दिली होती. आता याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात तब्बल 10 वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नाशिक गुन्हे शोध शाखा सध्या सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या डान्स प्रकरणाशी दाऊदच्या संबंधाचा तपास करत असताना, आता एसीबीने बडगुजर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
सुधाकर बडगुजर यांनी रविवारी (17 डिसेंबर) या गुन्ह्याची फारशी माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र, सोमवारी (18 डिसेंबर) याप्रकरणात नोटीस न देता, आधी गुन्हा दाखल करत रात्रभर दोन्ही बंगल्यावर निष्कारण चौकशी करून त्रास दिल्याचा आरोप बडगुजर यांनी केला.
तसंच, बडगुजर आणि कंपनी या फर्ममधून निवृत्त झालो असून, ही सर्व कंत्राटं ऑनलाईन होतात, त्यावेळी सर्व कागदपत्रे तपासले जातात, असं सांगत बडगुजर यांनी फर्मविषयीचे कागदपत्र आणि त्यांची कोर्ट ऑर्डरही दाखवली.
 
बडगुजर म्हणाले की, “पोलीस दबावाखाली काम करत असून त्यांनी संयमाने काम करायला हवे. सत्ता येते, सत्ता जाते. गरज पडल्यास कायदेशीर मदतही घेतली जाईल. जर मी दाखल केलेली कागदपत्रे खोटी असतील तर मी स्वतः एसीबी अधीक्षकांसमोर आत्महत्या करेन.”
 
बडगुजर यांच्या घरात गुन्ह्यासंबंधी कागदपत्रं सापडली - एसीबी
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वावलकर यांनी यासंदर्भात सांगितलं की, "नगरसेवक असताना नियमांची पायमल्ली करून स्वतःच्याच कंपनीला त्यांनी (सुधाकर बडगुजर) कंत्राट दिले होते. याप्रकरणी चौकशी सुरू होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन मनपा आयुक्तांनी तक्रार दिलेली होती.
 
"बडगुजर हे स्थायी समिती सदस्य असताना त्यांनी स्वतःच्याच कंपनीला 15 कंत्राटं दिले होते, ते सगळे नियमबाह्य होते. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मनपाची फसवणूक त्यांनी केली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर लक्षात आलं की यात तथ्य आहे आणि या संदर्भातले सगळे पुरावे आहेत. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हा दाखल करण्यात आला."
 
"चौकशीसाठी वेळोवेळी ते आणि त्यांचे भाऊ, तसंच इतर पार्टनर आलेले आहेत. त्यांनी दिलेले कागदपत्र आणि आमच्याकडे असलेले पुरावे यानुसार गुन्हा दाखल केलाय. मागच्या महिन्यापर्यंत बडगुजर चौकशीसाठी येत होते. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तीन दिवसांचा अवधी त्यांना दिलेला आहे. बडगुजर यांच्या घराच्या झाडाझडतीमध्ये गुन्ह्याच्या संबंधी महत्वाची कागदपत्रे सापडली आहेत," अशीही माहिती शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली.
 
Published By- Priya Dixit