1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (15:33 IST)

विधानसभा अध्यक्षाची निवड पावसाळी अधिवेशनातच होईल : थोरात

Assembly Speaker
विधानसभा अध्यक्षाची निवड विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच होईल, अशी माहिती महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसंच, विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होईल, असं देखील थोरात म्हणाले. नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर विधानसभा अध्यक्षाची जागा रिकामीच आहे.
 
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलैला होणार आहे. या अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी विरोधकांची मागणी आहे. दरम्यान, आता बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्षाची निवड पावसाळी अधिवेशनातच होणार असल्याची माहिती दिली. तसंच, याआधी काँग्रेसचाच अध्यक्ष असल्याने पुन्हा एकदा काँग्रेसचाच अध्यक्ष असेल, असं देखील थोरात म्हणाले.
 
बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील भाष्य केलं. शरद पवार हे सर्वांचेच मार्गदर्शक आहेत. मला वाटतं त्यांना पक्षाचं बंधन आघाडीमध्ये नाही आहे. सर्वांना ते योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतची भेट आमच्यासाठी विशेष बाब नाही. शेवटी आघाडीसाठी आणि राज्यातील जनतेसाठी मदत होणारी चर्चा असते, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.