1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 एप्रिल 2023 (10:04 IST)

अयोध्या दौरा: एकनाथ शिंदे, फडणवीस लवकरच पोहोचणार अयोध्यानगरीत

facebook
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच हेलिकॉप्टरने अयोध्येत दाखल होतील आणि नंतर श्रीरामाचे दर्शन घेतील. एकनाथ शिंदे सकाळी लखनौ विमानतळावर दाखल झाले होते. थोड्याच वेळात ते अयोध्येच्या दिशेनी रवाना होणार आहेत.
शिंदे यांच्यासोबत मंत्रिमंडळातील मंत्री, शिवसेनेचे आमदार आणि खासदार उपस्थित आहेत. त्यासोबत सहकारी पक्ष भाजपचे मंत्री-आमदार-खासदारही या दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार आहेत, असं मुख्यंत्र्यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. या दौऱ्यासाठी शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आल्याचं दिसून येतं.
एकनाथ शिंदे हे काल (8 एप्रिल) सायंकाळी पाच वाजता मुंबईहून विमानाने लखनौच्या दिशेने रवाना झाले होते.
 
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते लखनौमध्ये पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशात जोरदार तयारी करण्यात आली आहे. लखनौ विमानतळावर एका बँड पथकाने शिंदे यांचं स्वागत केलं.
 
त्यानंतर, शिंदे हे रस्तेमार्गे अयोध्येकडे रवाना झाले. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
 
शिंदे हे दुपारी 12 च्या सुमारास प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतील. ते हनुमान गढी येथेही जाऊन दर्शन घेणार असून भव्य राम मंदिराच्या बांधकामाची पाहणीही करणार आहेत.
दरम्यान, अयोध्येत संत-महंतांच्या भेटी घेऊन आशीर्वादही ते घेणार आहेत.
 
त्यानंतर, रात्री उशिरा एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची लखनौ येथे भेट होईल.
 
उत्तर प्रदेशातील महाराष्ट्र भवन आणि मुंबईतील उत्तर भारतीयांसह अन्य मुद्दय़ांवर दोन्ही नेते चर्चा करतील.
 
अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा विषय
अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असून प्रभू श्रीरामचंद्राच्या आशीर्वादानेच आम्हाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळालं आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लखनौमध्ये दाखल झाल्यानंतर केलं.
 
लखनौमध्ये पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट करून आरपली प्रतिक्रिया दिली.
 
ते म्हणाले, “जय श्रीराम, हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद, असे नारे देत आज लखनऊ विमानतळावर माझे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
 
“अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असून प्रभू श्रीरामचंद्राच्या आशीर्वादानेच आम्हाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळालं आहे.
 
प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकारी अयोध्येला आले आहोत.
 
ज्या उत्साहात आमचं येथे स्वागत झाले ते पाहता आमचाही उत्साह द्विगुणित झाला आहे.
 
“राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मी पहिल्यांदाच अयोध्येला आलो असून इथले वातावरण आणि स्वागत पाहून आनंद आणि समाधान वाटत आहे. या दौऱ्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सर्व मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 
असा असेल शिंदेंचा दौरा
* 9 एप्रिलला सकाळी 10 वाजता ते अयोध्येकडे रवाना होतील.
* 11 वाजता हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहचतील.
* 12 वाजता राम मंदीराच्या ठिकाणी महाआरती करतील. त्यानंतर राम मंदिराचं काम सुरू असलेल्या ठिकाणाची पाहणी करतील.
* दुपारी 2.30 च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन पुढे महंतांच्या कार्यक्रमासाठी लक्ष्मण किल्यावर दाखल होतील. * तिकडच्या महंताकडून धनुष्यबाण स्विकृतीचा कार्यक्रम होईल.
* संध्याकाळी 6 वाजता शरयु नदीची आरती केली जाईल. त्यानंतर एकनाथ शिंदे लखनऊकडे रवाना होतील.
* रात्री 9 वाजता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे भेटीसाठी पोहचतील.
* साधारण रात्री 10 वाजता शिंदे मुंबईकडे रवाना होतील.
 
Published By- Priya Dixit