गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2017 (23:19 IST)

डॉ. आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 28 स्थळांचा विकास करणार

भातरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांसाठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाची असलेल्या तब्बल 28 स्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी 170 कोटी रूपयांपैकी चालू वर्षासाठी वीस कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.
 
सामाजिक समतेच्या लढ्याची सुरुवात केलेल्या महाडच्या चवदार तळ्याचा परिसर, क्रांतीस्तंभ आणि सभागृहाचे नुतनीकरण तसेच आंबावडे या बाबासाहेबांच्या गावातील स्मारकाचा विकास करण्यात येणार आहे. माता रमाई यांचे जन्मस्थान असलेले वणंद, शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप साकारणारे चरी या अलिबागमधिल स्मारकाचा तसेच पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील बाबासाहेबांच्या बंगल्याची डागडुजी व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. बाबासाहेबांना अस्पृष्य म्हणून बैलगाडीतून उतरवण्याचा प्रकार घडलेल्या तदवळे या उस्मानाबाद जिल्ह्यात विकासकामे करण्यात येणार असल्याचेही बडोले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपूर येथे दिक्षा दिलेल्या स्थळाचे सुशोभिकरण, गोंदिया जिल्ह्यातील देसाईगंज येथील दिक्षाभूमी, बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील मातीचा बुध्दविहाराचे नुतनीकरण तसेच सातारा जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाबाई यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
 
संत चोखामेळा यांचे जन्मस्थान असलेल्या मेव्हणा राजा, या बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाचे सुशोभिकरण लहुजी  वस्ताद साळवे यांचे संगमवाडी या पुणे जिल्ह्यातील स्मारकाचा विकास करण्यात येणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वाटेगाव जिल्हा सांगली येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजातून मागणी करण्यात येत होती आता प्रत्यक्षात या स्मारकांना मूर्त रूप येणार असल्याचे बडोले म्हणाले.
 
तसेच सातारा जिल्ह्यातील नायगाव या सावित्रीबाई फुले यांचे जन्मगावी स्मारकाचा विकास करण्यात येणार आहे. बाबासाहेब सातारा येथील ज्या शाळेत शिकले त्या ऐतिहासिक एलिमेंटरी स्कुलमध्ये वाचनालय आणि ग्रंथालयाचा विकास करण्यात येणार  आहे. तसेच औरंगाबाद येथील मिलींद कॉलेजमध्ये मध्यवर्ती अभ्यासिका आणि वाचनालयाचा विकास करण्यात येणार आहे. सोबतच काडाईकोंड या रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाचा  विकास करण्यात येणार असल्याचेही बडोले यावेळी म्हणाले. देहूरोज येथील ऐतिहासिक बौध्द विहार, गोंदिया  जिल्ह्यातील भीमघाट येथील बौध्द विहार, धम्मकुटी, कालीमाटी येथील बौध्द विहार, ठाणे जिल्ह्यातील किन्हवली येथे स्मारक उद्यान, सांस्कृतिक भवन आदी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.