रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (12:57 IST)

बी.फार्मसीच्या निकालासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा घेराव

औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील बी.फार्मसीच्या शेवटच्या वर्षाच्या ऑनलाईन निकालात गोंधळामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील व शहराध्यक्ष मयूर सोनवणे यांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांनी परीक्षा नियंत्रकांना घेराव घातला व त्वरित निकाल लावण्याची मागणी करण्यात आली.

खा. शरद पवार यांनी दिली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला भेट

ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांवर मोतीबिंदूची विनामूल्य शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी बहाल करण्याचे काम प्रशंसनीय आहे अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार  यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पुणे जिल्हा परिषद, अंधत्व निवारण सोसायटी आणि सुनेत्रा पवार यांच्या एनव्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास आज शरद पवार यांनी भेट देत रुग्णांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार , डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार अॅड. वंदना चव्हाण  याही येथे उपस्थित होत्या.

गेल्या पाच वर्षांपासून फोरमच्या वतीने बारामतीच्या पंचक्रोशीतील रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते. रुग्णांना या शिबिरात एक रुपयाही खर्च न करता दृष्टी प्राप्त होते ही बाब प्रशंसनीय असल्याचे सांगून फोरमच्या टीमवर्कचेही पवार यांनी कौतुक केले. या शिवाय सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाची टीम आणि पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचेही त्यांनी कौतुक केले. पवार यांनी शिबिरात दाखल झालेल्या रुग्णांचीही चौकशी केली. डॉ. लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी त्यांना शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.