Ban on going to Harihar Fort हरिहर गडावर जाण्यास बंदी; सुफलीची वाडी, मेटघरसह 5 गावांचे होणार स्थलांतर
Ban on going to Harihar Fort रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुफलीची वाडी, मेटघरसह पाच गावांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या गावांनी ठराव केल्यावर ही प्रक्रिया सुरू होईल. तसेच, पर्यटकांना हरिहर गडावर जाण्यास वन विभागाने पूर्णत: बंदी घातली आहे.
सप्तशृंगगडावरील नागरिकांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत स्थलांतराची मागणी केली. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुफलीची वाडी, गंगाद्वार, पठारवाडी, विनायक मेट, जांबाची वाडी या गावांनाही धोका संभवतो. त्यामुळे या गावांच्या स्थलांतराबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले.
त्यानुसार उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानुसार गावकऱ्यांनी स्थलांतराची तयारी दर्शवत काही जागा सुचविल्या. या सर्व जागा वन विभागाच्या अखत्यारित असल्याने यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या कार्यालयात सोमवारी (ता. २४) बैठक घेण्यात आली.
सध्या ही गावे ज्या जागेवर वसलेली आहेत, ती जागा वन विभागाची आहे. वनहक्क कायद्यानुसार या जागा या कुटुंबांना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांच्या जीविताला धोका लक्षात घेता डोंगराच्या खाली वन विभागाच्या जागेवर कुटुंबांचे स्थलांतर करून सध्याची जागा वन विभागाने ताब्यात घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
या संदर्भात एक आठवड्यात ग्रामपंचायतीने ठराव करून स्थानिक वनहक्क समितीकडे पाठवावा. स्थानिक समितीने आठवडाभरात हा प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठवावा. समितीच्या निर्णयानंतर या गावांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
पाच गावांतील १७० कुटुंबांचे स्थलांतर:
तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनाकडून या रहिवाशांच्या स्थलांतरासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. यात सुफलीची वाडी येथील ८१ घरे, गंगाद्वार येथील ५३, पठारवाडी येथील पाच, विनायक मेट येथील १५, तर जांबाची वाडी येथील १६ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.