महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद गेली अनेक दशकं सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या जत, अक्कलकोट, सोलापूर अशा भागांवर दावा ठोकल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालं.
या सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी नेमण्यात आलेले समितीचे नेते चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई उद्या (6 डिसेंबर) बेळगाव दौऱ्यावर जाणार होते.
मात्र, त्यांचा हा दौरा तूर्त रद्द करण्यात आला असून तो लांबवणीवर टाकण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. दोन्ही राज्यांमध्ये भाजपचंच सरकार असल्याने महाराष्ट्रातील नेतृत्वाकडून टोकाची भूमिका घेतली जात नसल्याच्या चर्चा रंगल्यात.
नेमकं काय घडलं ?
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची तयारी दर्शवली होती.
बोम्मईंच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा तापला.
महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांची समन्वय समिती नेमली होती.
हे दोन्ही मंत्री उद्या सीमा भागात जाऊन मराठी बांधवांची भेट घेणार होते. यासंदर्भात गेल्या आठवड्यात तसं जाहीर करण्यात आलं होतं. पण मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सीमा भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा दौरा रद्द करावा, असं आवाहन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं.
कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना मंत्र्यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली होती.
या सगळ्या घडामोडींमध्ये अचानक दौरा रद्द झाल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (5 डिसेंबर) सकाळी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं.
ते म्हणाले की, "आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सीमावादासंदर्भात सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. यासंदर्भात कर्नाटक आणि महाराष्ट्र निर्णय घेऊ शकत नाही. राज्याने अत्यंत ताकदीने कोर्टात आपली भूमिका मांडली आहे."
ते पुढे म्हणाले की, "विनाकराण यासंदर्भात नव्या वाद सुरु करणं चुकीचं आहे. मंत्र्यांच्या हा दौरा महापरिनिर्वाण दिनासाठी होता. एका कार्यक्रमाला मंत्री जाणार होते. यासंदर्भात कर्नाटकचं काही म्हणणं आहे. महाराष्ट्राचं देखीलं म्हणणं आहे.
मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मात्र महापरिनिर्वाण दिनी आपण अशा प्रकारचा वाद निर्माण करायचा का हा महत्त्वाचा मुद्दा आहे."
"आमच्यासाठी महापरिनिर्वाण दिन महत्त्वाचा आहे. आणि त्यादिवशी आंदोलन व्हावं, कोणत्याही प्रकारची घटना व्हावी, हे योग्य नाही. तिथे जायला कोणाही घाबरत नाही. मला असं वाटतं की, स्वतंत्र्य भारताच्या कोणत्याही भागात कोणी कोणाला जाण्यापासून थांबवू शकत नाही. मात्र, महापरिनिर्वाण दिन असल्यामुळं काय करावं यासंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील."
मात्र यावर "बेळगाव दौऱ्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या दौऱ्याबाबत कर्नाटक सरकारला कळवलं आहे. या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील," असं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलंय.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौऱ्यावरुन सुरु असलेल्या चर्चांबाबत भाष्य केलं.
देसाई म्हणाले की, "6 तारखेला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावातील मराठी बांधवांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्ही आमचा दौरा 6 तारखेला निश्चित केलेला आहे. आम्ही येणार आहोत हे कर्नाटक सरकारला कळवलं आहे. सविस्तर दौरा कळवलेला नाही. या घटकेला आम्ही दौरा रद्द केल्याबाबत अधिकृत कळवलेलं नाही."
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाद निर्माण होऊ नये म्हणून दौरा पुढे ढकलल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर देसाई म्हणाले की, "उपमुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द व्हावा असं म्हटलेलं माझ्या तरी ऐकिवात नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करुन जो आदेश देतील त्यानुसार अंतिम निर्णय घेऊ"
दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली होती.
कबड्डीचा खेळ महाराष्ट्रात असून, त्याला एक सीमारेषा असते. या दोन मंत्र्यांनी किमान महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमारेषेला स्पर्श करून तरी यावे. बाकी महाराष्ट्रात काय कबड्डी खेळायची ती खेळा. पण, तिकडे सीमेवर तरी जाऊन यावं असं आव्हान संजय राऊत यांनी शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं.
यावर शंभूराज देसाई म्हणाले, "आमच्या मध्ये काय हिंमत आहे हे किमान संजय राऊत यांना तसेच त्यांच्या शिवसेनेला आम्ही पाच महिन्यांपूर्वी दाखवलेलं आहे. त्यामुळे आमची हिंमत काय आहे, आमच्यात काय धमक आहे, आमच्यात किती ताकद आहे याचा संजय राऊत साहेबांनी अनुभव घेतलेला आहे.
आमच्या बाबतीत त्यांनी ते बोलू नये. भाजप आणि शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांसाठी, सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी, महाराष्ट्रातकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत या याबाबतीतल्या चर्चा करण्यासाठी आम्ही तिथे जातो आहोत. तुम्ही केवळ बोलता आम्ही करून दाखवतो."
सहा डिसेंबर नंतर कर्नाटकात कुणी आलं तर कारवाई करण्याचा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. त्यावर बोलताना आम्ही काय हाताची घडी घालून शांत बसणार नाही, असं प्रत्युत्तर शंभुराज देसाई यांनी दिलं आहे.
Published By- Priya Dixit