मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: भंडारा , मंगळवार, 1 मे 2018 (08:56 IST)

भंडारा भीषण अपघातात 8 ठार 13 जखमी

जिल्ह्यातील लाखनी तालुक्‍यात राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या नागपूरच्या वऱ्हाड्यांना कंटेनरने चिरडल्याची घटना सोमवारी रात्री 8च्या सुमारास घडली. या अपघातात सुमारे 8 ठार तर 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे. संतप्त नागरिकांनी रास्तारोको करत संताप व्यक्त केला आहे. यामुळे ताण निर्माण झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वरील लाखनी येथील कुमार पेट्रोलपंपाजवळील ग्रेसलॅण्ड सेलिब्रेशन हॉल व लॉन आहे. सोमवारी सायंकाळी येथील विवाह सोहळ्यासाठी नागपूरचे हरगुडे कुटुंबातील वऱ्हाडी आले होते. लग्न लागल्यानंतर वऱ्हाडी महामार्गाच्या कडेला उभे होते. याच दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून कंटेनर घेऊन जाणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नवरदेवाच्या गाडीला धडक देत वऱ्हाड्यांना चिरडले. मृतकांमध्ये हिंगणघाट येथील एक दाम्पत्य आणि दहा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती ढासळल्याने नंतर त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.