बाळ बोठेविषयी मोठी बातमी; जामीन अर्ज…
अहमदनगर : रेखा जरे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे. खुनाच्या गुन्ह्यात जामीन फेटाळल्यानंतर आता विनयभंगाच्या गुन्ह्यातील जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी हा आदेश दिला.
रेखा जरे यांच्या खुनाची घटना घडल्यानंतर नगर शहरातील एका विवाहित महिलेने बोठे विरूद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात 27डिसेंबर 2020 रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी बोठे याने प्रथम जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता.तेथे न्यायालयाने तो फेटाळला. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात बोठे याने उच्च न्यायालयात आपील केले होते. आरोपीविरूदध सबळ पुरावे आहेत. त्याचे फिर्यादी महिलेसोबत वारंवार बोलणे झाल्याचे पुरावे आहेत. असा युक्तिवाद करून सरकारतर्फे यासंबंधीचे पुरावेही न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.