1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (08:18 IST)

राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा!- आशिष शेलार

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबतची सूचना दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेवरून भाजपामधील अनेक नेत्यांनी आपली नाराजी तीव्र व्यक्त केली. याचवरून, आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी देखील शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्र्यांनी परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबत केलेलं वक्तव्य हे अत्यंत असंवेनशील आहे. शिवसेनेने प्रत्येक विषयावर राजकीय अस्मितेचा धंदा सुरु केला आहे”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
 
“मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याला आमचा १०० टक्के आक्षेप आहे. गुन्हा आणि पीडितेबाबत असंवेदशीलता दाखवणारं हे वक्तव्य आहे. प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरु केला असून वाढत्या गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी येणाऱ्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून लोकांचं लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे”, असा आरोप देखील यावेळी आशिष शेलार यांनी केला आहे. यावेळी, शिवसेनेने राजकीय अस्मितेचा धंदा बंद करुन गुन्हेगारीमुक्त मुंबईकडे लक्ष द्यावं असा सल्ला देखील शेलार यांनी दिला आहे.
 
…मग NRC ला विरोध का?
“मुख्यमंत्री गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी विघटनवादी भूमिका घेत आहेत. रिक्षाचा वापर झाला म्हणून परराज्यातील लोकांची नोंदवही? मग उद्या जर एसटीचा वापर झाला तर गावातल्या लोकांची देखील नोंदवही करणार का? असा प्रश्न करत शेलार पुढे असंही म्हणाले केली की, “शिवसेनेचा राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) ला विरोध आहे. मग परराज्यातील नागरिकांची नोंदवही ठेवण्याचा पुरस्कार कसा करता? त्यामुळे, शिवसेनेने आता आपली नौटंकी बंद करुन NRC, CAA बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.”
 
मी मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करणार!
दिलीप वळसे-पाटील यांनी ‘शक्ती कायद्या’बाबत महत्वाची घोषणा केली आहे. आगामी विधिमंडळ अधिवेशनात राज्याच्या शक्ती कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल सादर केला जाईल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्याचसोबत, “परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल” या मुख्यमंत्र्यांच्या सूचनांवर रोष व्यक्त करत भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले होते की, “परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचं वक्तव्य म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात मी तक्रार दाखल करणार आहे. एका विशिष्ट समाजात द्वेष पसरवणं, भीती पसरवणं हा कायद्याने गुन्हा आहे.”