मंत्री छगन भुजबळांच्या ओबीसींबाबतच्या भूमिकेला भाजपा नेते पडळकरांचे समर्थन
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समुदायाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीला अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे,त्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. शिवाय ओबीसी जनगणनेसाठी मी पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचेही भुजबळांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ओबीसींची जनगणना करण्यासाठी छगन भुजबळ पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याबाबत विचारले असता गोपीचंद पडळकर म्हणाले, “चांगला विषय आहे. ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, हे सगळ्यांचेच मत आहे. अलीकडेच जेव्हा ओबीसींची बैठक झाली. तिथेही या मुद्यावर चर्चा झाली. आमच्या एका सहकाऱ्याने व्यवस्थितपणे हा विषय मांडला. तेव्हा सरकारनेही सकारात्मकता दाखवली होती. त्यामुळे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, हे माझेही मत आहे.”
मराठा आरक्षणाबाबत पडळकर पुढे म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना जसं वेगळं आरक्षण दिले होते, तसे आरक्षण मराठा समाजाला द्यावे, त्या आरक्षणाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमची काल जी भूमिका होती, तीच आज आहे आणि उद्याही तीच भूमिका असेल.मराठा आरक्षणाला आमचा नेहमीच पाठिंबा आहे.