बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 मे 2021 (19:34 IST)

महाराष्ट्रात कुठेही लसनिर्मिती प्रकल्प झाला तरी आनंदच;भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी - अजित पवार

पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी पार पाडली आहे. भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता. त्यामुळे ‘भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला’ हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औटघटकेच्या प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
 
देशावरील कोरोना संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी, भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या ‘इंटरवेट इंडिया प्रा लि.' (बायोवेट)  कंपनीची जागा मिळावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली व दाद मागितली. उच्च न्यायालयाने कोरोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्याची जबाबदारी पार पाडली असेही अजित पवार म्हणाले. 
 
कोरोनापासून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प तातडीने सुरु होणे गरजेचे आहे. लस उत्पादनाची गरज आणि न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन भारत बायोटेकला राज्यात लस उत्पादन सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाकडून पार पाडण्यात येत आहे. यामागे देशातील नागरिकांना कोरोनावरील लस लवकर उपलब्ध व्हावी हाच हेतू आहे. पुणे, नागपूरसह राज्याच्या कुठल्याही विभागात हा लसनिर्मिती प्रकल्प झाला असता तर माझ्यासह प्रत्येक महाराष्ट्रवासियाला आनंदच झाला असता. भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात न्यायालयाच्या आदेशाने सुरु होत आहे, त्यामुळे अजित पवारांनी भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवला हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप निराधार, तथ्यहीन, औटघटकेच्या प्रसिद्धीसाठी, सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी खोटे बोलून नागरिकांची दिशाभूल करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एक असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा, विभागाचा औद्योगिक, आर्थिक, पायाभूत विकासासाठी महाविकास आघाडी सरकार बांधील आहे. विरोधकांनी खोटे, तथ्यहिन आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आता थांबावावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.