शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 मे 2021 (15:58 IST)

पंतप्रधानांना पत्र लिहिल्यानेच राज्याला सर्वाधिक मदत- फडणवीस

अकोला महाराष्ट्राला आवश्यक असलेली मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नेहमीच मागत असतो. त्यामुळे पंतप्रधानांनी राज्याला सर्वाधिक रेमडेसिविर, प्राणवायू, व्हेंटिलेटरचा पुरवठा केला. त्याचा योग्य वापर करून घेण्यात राज्य शासन अपयशी ठरले, असा आरोप माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘अनेक नेत्यांना नुसती टीका करण्याची सवय असते, अशांना मी उत्तर देत नसतो’ असा टोलाही त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला. अकोला जिल्हय़ातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते रविवारी येथे आले होते. आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. त्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी नाना पटोलेंचा समाचार घेतला. केंद्र शासनाने दिलेल्या मदतीचा योग्य वापर होत नसल्याच्या मुद्यावरून त्यांनी राज्य शासनावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच पत्र लिहित असतो. त्यांच्याकडे वारंवार मागणी केल्यानेच केंद्र शासनाने राज्याला रेमडेसिविर, प्राणवायू, व्हेंटिलेटरची सर्वाधिक संख्येने मदत दिली. त्यासोबतच इतर सुविधाही राज्याला केंद्राकडून मिळाल्या. त्याचा योग्य वापर करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. मात्र, अनेक ठिकाणी चार-चार महिन्यांपासून व्हेंटिलेटरचा वापर झाला नाही. वापराअभावी केवळ पडून असल्याने ते खराब देखील होत आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या यंत्राचा ताबडतोड वापर करणे आवश्यक होते. मात्र, राज्य सरकारने त्यात हलगर्जीपणा केला.’
 
‘सीएसआर’ निधीतून प्राणवायू प्रकल्प
 
ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचे मजबुतीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शहरी भागातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता विशेष मोहीम राबवून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले. ‘सीएसआर’ निधीतून प्राणवायू प्रकल्प दिला असून तो लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सवरेपचार रुग्णालयातील सभागृहात आयोजित जिल्हय़ातील करोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
 
 लसीकरण मोहिमेमध्ये नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रावरील नियोजनशून्य कारभारावर फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. अकोला जिल्हय़ासाठी १४० जम्बो सिलिंडरचा प्राणवायू प्रकल्प ‘सीएसआर’ निधीतून दिला आहे. तो लवकरच सुरू होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शोभादेवी गोयनका कोविड केंद्राला भेट दिली. त्यानंतर ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयाची पाहणी करून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी प्राणवायू प्रकल्पाची देखील पाहणी केली.