मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 15 मे 2021 (20:03 IST)

कोरोना: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्टर लावल्याने 15जण अटकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी पोस्टर्स लावल्याप्रकरणी राजधानी दिल्लीत पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे.
 
दिल्लीच्या विविध पोलीस स्थानकांमध्ये याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
 
'मोदीजी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यूँ भेजी?' असं लिहिलेली पोस्टर दिल्लीच्या विविध भागांमध्ये लावण्यात आल्याचं आढळून आलं. या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
 
देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. एप्रिल महिन्यात अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा अनियमित झाल्याने रुग्णांना जीव गमवाला लागला होता. औषधं, व्हेंटिलेटर, बेड्स यांची कमतरता जाणवते आहे.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सगळ्यांना लस घेता येणार आहे. मात्र सध्या देशभरात अनेक ठिकाणी लशीची तीव्र टंचाई जाणवते आहे. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड अशा दोन लशी उपलब्ध आहेत. रशियानिर्मित स्पुटनिक लसही आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
गुरुवारी रात्री दिल्ली पोलिसांना याबाबत कळलं. भारतीय दंड संहितेच्या कलम188 अंतर्गत 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
यासंदर्भात अधिक तक्रारी दाखल केल्या गेल्या तर आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात. ही पोस्टर नक्की कोणी लावली यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. उत्तर दिल्लीत दोघांना अटक करण्यात आली.
 
मध्य दिल्लीत चारजणांना तर रोहिणी भागात दोघांना अटक करण्यात आली आहे. द्वारका भागात दोघांना अटक करण्यात आली आहे.
 
हे पोस्टर लावण्यासाठी पाचशे रुपये देण्यात आल्याचा दावा अटक केलेल्या एका व्यक्तीने केला आहे. शहादरा नावाच्या भागात पोलिसांना या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं असून, एक व्यक्ती पोस्टर लावताना दिसत आहे. त्या व्यक्तीला पकडण्यासाठी पोलिसांचा शोध सुरू आहे.