शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (08:09 IST)

भाजपवर टीका करणं ही राऊत यांची नोकरी आहे : चंद्रकांत पाटील

संजय राऊत हे जगभरातील जवळपास १८२ देशांचे प्रमुख आहेत. राऊत यांच्याकडे फक्त महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतातील नव्हे, तर संपूर्ण जगभरातील वेगवेगळ्या विषयांबाबतचे ज्ञान आहे. त्यांच्याविषयी आणखी काय बोलू, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. पदवीधर मतदार नावनोंदणी अभियान पुण्यात राबविले जात आहे. यानिमित्ताने ते बोपोडी येथे आले होते, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. 
 
बेळगाव कारवारचा समावेश महाराष्ट्रामध्ये करण्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, बेळगाव-कारवार भागातील अनेक गावात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशी सुमारे ८०० गावे आहेत. ती महाराष्ट्राला मिळालीच पाहिजेत. महाराष्ट्र ही मोठ्या समाज सुधारकांची आणि संतांची भूमी आहे. सीमाभागातील सर्व मराठी भाषिकांच्या आंदोलनांना भारतीय जनता पक्षाचं समर्थन आहे. आणि ही सर्व गावे महाराष्ट्रात आली पाहिजेत, अशी भाजपची भूमिका आहे. 
 
भाजपवर टीका करणं ही राऊत यांची नोकरी आहे. आणि ते आपली नोकरी अगदी काटेकोरपणे बजावत आहेत. पण इतर कुणी टीका केलेली त्यांना चालत नाही, त्यांना लगेच टोचतं. तसेच शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात, हे संजय राऊतांनी मान्य केलं आहे. म्हणजे पवार सरकार चालवतात हे शिवसेनेनं मान्य केलं आहे, अशा शब्दांत पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. 
 
महाविकास आघाडी सरकार जर ५ वर्ष चालणार असेल तरीदेखील आमचा काही आक्षेप नाही. आम्ही प्रखर विरोधी बनून अन्यायाविरुद्ध सरकारची झोप उडवत राहू. राज्य सरकारला ट्रेन, बस सुरू झाल्यावर त्यामध्ये होणारी गर्दी दिसत नाही, पण मंदिर सुरू करण्याआधीच तिथे होणाऱ्या गर्दीची त्यांना चिंता वाटते, अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.