शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कोल्हापूर , सोमवार, 25 एप्रिल 2022 (20:44 IST)

राधानगरी अभयारण्यात ब्लॅक पँथरही? अर्धवट काळा बिबटय़ा कॅमेऱयात कैद

black panther
राधानगरी अभयारण्याचे अंतरंग किती वैविध्यपूर्ण आहे याचे दर्शन या जंगलात ठिकठिकाणी लावलेल्या ट्रप कॅमेऱयांमुळे अधिक स्पष्ट होऊ लागले आहे. या जंगलातील ट्रप कॅमेऱयात जसा पट्टेरी वाघ टिपला गेला तसा अर्धवट काळा या स्वरूपातील ब्लॅक पॅंथरही टिपला गेला आहे. 18 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजून 49 मिनिटांनी राधानगरी जंगलातील दोन कॅमेऱया समोरून हा निम्म्याहून अधिक काळा असलेला ब्लॅक पँथर पुढे गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
ब्लॅक पॅंथर म्हणजे काही चमत्कार नसतो. किंवा तो नरभक्षक नसतो. प्राण्याच्या शरीरात जे रंगद्रव्य असतात त्यात दोष तयार होतात. (मेलॅनिस्टिक). त्यामुळे त्याचा रंग बदलतो व त्वचेवर काळा रंगद्रव्य वाढतो. त्यामुळे हा तो ब्लॅक पॅंथर म्हणून ओळखला जातो. कोल्हापूर जिह्यात पाटगाव व रांगणा परिसरात यापूर्वी ब्लॅक पॅंथर आढळला आहे.
 
राधानगरी जंगलातील हा ब्लॅक पॅंथर पूर्ण काळा नाही. त्याच्या मानेपर्यंतचा भाग पिवळा किंवा मूळ रंगाशी बराच मिळताजुळता आहे. मात्र पुढच्या पायापासून मागे शेपटीपर्यंत त्याचा रंग काळसर आहे. त्यामुळे बिबटय़ाच्या नोंदीत या अर्धवट काळ्य़ा वर्णाच्या ब्लॅक पॅंथरचीही नोंद झाली आहे. राधानगरी जंगलात नेहमीच्या स्वरूपातले 35 ट्रप कॅमेरे आहेत. पण या जंगलाचा एकूण विस्तार व त्या तुलनेत या कॅमेऱयांच्या कक्षेत येणारे जंगल यामुळे या नेहमीच्या कॅमेऱयात वन्यजीवांच्या फार कमी हालचाली टिपल्या जात होत्या. मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांनी तातडीने ज्यादा 100 कॅमेरे खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला. या शंभर कॅमेऱयांच्या कक्षेत अजूनही संपूर्ण जंगल नाही. पण पूर्वीपेक्षा अधिक जंगल त्याच्या कक्षेत येऊ शकले आहे. त्यामुळे त्यात पूर्ण वाढ झालेला एक पट्टेरी वाघ दोन समोरासमोरच्या कॅमेऱयात रात्री साडेआठ वाजता टिपला गेला. तर ब्लॅक पँथर सायंकाळी पाच वाजून 49 मिनिटांनी टिपला गेला. राधानगरी जंगलात ब्लॅक पॅंथर असणे हे जैवविविधतेचे लक्षण मानले जात आहे. या वाघ आणि या ब्लॅक पॅंथर शिवाय रानमांजर, साळींदर, रान कुत्र्यांचे अनेक कळप असे वैविध्यपूर्ण प्राणी कॅमेऱयात टिपले गेले आहेत.