रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 ऑगस्ट 2022 (10:25 IST)

'दोघांनी दिल्ली वाऱ्या करायच्या आणि बाकीच्यांनी वाट पहायची'-अजित पवार

ajit pawar
सचिवांना अधिकार देऊन दोघे `टिकोजीराव` दिल्ली वाऱ्या करीत आहेत. हा कसला कारभार? या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
 
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने `निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा` मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.
 
राज्यात गेल्या 35 दिवसांपासून दोघेच जण कारभार करत असल्याकडे लक्ष वेधत अजित पवार यांनी म्हटलं, की "मंत्रिमंडळ स्थापन करण्यात का विलंब होत आहे? तेच समजत नाही. फुटलेल्या आमदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता येत नसावी, अशी शंका मनात येते. दोघांनी पदे घ्यायची. दिल्ली वाऱ्या करायच्या आणि बाकीच्यांनी वाट पहायची. हा कसला कारभार?"
 
अजित पवार यांनी म्हटलं, "सर्व विभागाच्या मंत्र्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या संबंधित सचिवांकडे सोपवल्याबाबतचा आदेश मुख्यमंत्र्यांनी चार ऑगस्टला काढला. त्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, हे काय चालले आहे? मंत्रालयाचे नाव सचिवालय करा."