मात्र यापैकी काही झालं नाही, बाळासाहेब थोरात यांचा फडणवीसांना टोला
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतलं. ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू, असंही म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर संन्यास घेईन म्हणतात; मात्र यापैकी काही झालं नाही”, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात बोलताना राजकीय संन्यास घेण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. “राज्याची सूत्रे भारतीय जनता पक्षाकडे सोपविली तर दोन ते तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण परत मिळवून देतो आणि जर मी हे करू शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईन,” असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्या या घोषणेवर बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना टीका केली.