1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (15:08 IST)

राज्यातील सर्व शाळेत CCTV अनिवार्य

राज्यातील सर्व माध्यमांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविणे बाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे ते सुरू असतील याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल.असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केले.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शासकीय शाळांसोबत खासगी शाळेत देखील सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 
 
आता पर्यंत 65 हजारापैकी 1624 शाळेत सीसीटीव्ही केमेरे बसवले आहेत. शाळेत सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात येणार असून काही आक्षेपार्ह घटना घडल्यास त्याची तक्रार करता येईल. 
 
शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वी सर्व खासगी आणि शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्ही केमेरे सुरु असण्याबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. त्या म्हणाल्या राज्यात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे धोरण ठरविण्यात आले असून आता पर्यंत 65 हजारापैकी 1624 शाळेत सीसीटीव्ही केमेरे बसवले आहेत.
 
शाळा स्तरावरील सखी-सावित्री समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, महिला शिक्षक प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला प्रतिनिधी), पोलीस पाटील, महिला ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला पालक प्रतिनिधी, शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी (२ विद्यार्थी व २ विद्यार्थीनी) इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. सखी-सावित्री समितीमार्फत शाळांमध्ये निकोप, समतामुलक व आरोग्यमय वातावरण निर्माण होईल याबाबत काळजी घेण्यात येईल. तसेच सदर समितीला दर महिन्याचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्याची जबाबदारी देण्यात येईल. त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास समिती त्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीकडे करेल व तक्रारीचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल.

सर्व शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत किंवा नाही, सखी-सावित्री समित्यांचे गठण व नियंत्रण याबाबतची जबाबदारी आयुक्त (शिक्षण) यांची राहील.शाळांमध्ये मुलींना मार्गदर्शन करण्याकरीता एका महिला शिक्षकेवर जबाबदारी देण्यात येईल. पोलीस विभागामार्फत पोलीस स्टेशन पातळीवर पोलीस काका / पोलीस दीदी संकल्पना राबविण्यात आली असून या पोलीस काका व पोलीस दीदींची तसेच सखी-सावित्री समितीतील महत्वाच्या सदस्यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक शाळेच्या दर्शनी भागावर ठळकपणे दर्शविण्यात येतील.