शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (10:43 IST)

पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

mansoon
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने 16 जूनपर्यंत पावसाचा अंदाज जाहीर केला असून, या कालावधीत जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. नागपूर हवामान विभागाने 11 जूनपासून पावसाची शक्यता वर्तविली. त्यानुसार जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली असल्याचे दिसून येत आहे. पुढील चार दिवसांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहात असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीच्या अनुषंगाने कामांना वेग दिला असून, कृषी केंदांवर बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शिवाय शेती कामे आटोपली असून, कापूस, हळद या पिकांची लागवड करण्यासाठी तयारी केली जात असल्याचे चित्र विविध भागात दिसून येत आहे. पावसाला दोन दिवसापासून सुरुवात झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहेत. तसेच मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. अशातच मराठवाड्यात येत्या 3 दिवसांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. 
 
पेरणीसाठी घाई करू नये
येत्या काही दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी पेरणीयोग्य पाऊस होणार नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत. 22 जूननंतरच जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस होणार असून, त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तापमान घसरले
गत तीन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान कमालीचे घसरले आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे तापमान 38.5 अंश होते, तर शनिवारी पारा 37 अंशांवर राहिला. रविवारी तापमान 36 अंशांवर होते. तापमान घसरल्याने गत तीन महिन्यांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे