शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (09:29 IST)

पुढील 2 दिवसांत मान्सून अरबी समुद्रात धडकणार, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता

सध्या संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. सूर्य आग ओकत आहे. देशात काही भागात सध्या असनी चक्रीवादळाचं संकट आहे. यामुळे आंध्र प्रदेशला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यात आज सकाळपासूनच वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवर देखील होणार आहे. त्याबाबत हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. अशातच आता अंदमानच्या समुद्रानंतर सध्या बंगालच्या उपसागरात प्रगती करत असलेला र्नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकत आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याची भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
 
दरम्यान, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे सध्या देशातील पूर्वोत्तर भाग आणि दक्षिणेकडील राज्यांत काही भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस होत असून, महाराष्ट्रातही काही भागात पावसाची हजेरी आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊसधारा बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
 
पुढील दोन ते दिवस दिवस कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. विदर्भात प्रामुख्याने अमरावती आणि अकोल्यात 21 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे.