रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (16:32 IST)

छगन भुजबळ म्हणतात, ‘मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही,’ जरांगेंचं प्रत्युत्तर ‘भुजबळांचं वय झालं’

chagan bhujbal
छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात जालन्यातल्या अंबडमध्ये शुक्रवारी ओबीसी एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं.
 
यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
 
छगन भुजबळ यांनी 2 वर्षं तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली अशी टीका जरांगे पाटील यांनी केली होती.
 
त्यावर प्रत्युत्तर देताना भुजबळ यांनी जरांगे पाटली यांना म्हटलंय, “हो मी तुरुंगात झुणका भाकरी खाल्ली, आज दिवाळीतही खातो. मी कट्टाची भाकरी खातो. मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही.”
 
तसंच दगडाला शेंदूर लावून कुठला देव झाला तुझा, अशी टिकासुद्धा भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर केली आहे.
 
तू माझ्या शेपटीवर परत पाय देण्याचा प्रयत्न करू नकोस, असा इशारासुद्धा भुजबळ यांनी दिला. तसंच त्यांनी ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली आहे. ती तातडीनं करा, असंही ते म्हणालेत.
 
यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असंही ते म्हणाले.
 
हा ओबीसांचा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही, तालुक्या तालुक्यात मेळावे घ्या, असंसुद्धा ते म्हणालेत.
 
पोलिसांनी नेत्यांच्या गावबंदीचे फलक हटवावेत, असंसुद्धा भुजबळ यावेळी म्हणाले आहेत. तसंच कुणी काही केलं तर त्याला शांतपणे उत्तर द्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
 
पुढचा ओबीसी मेळावा 26 नोब्हेंबरला हिंगोलीमध्ये होणार आहे.
 
भुजबळांचं आता वय झालं - जरांगे पाटील
“आम्ही तुमचासुद्धा बायोडेटा गोळा केला आहे. इथं सासरा आणि जावयाचा प्रश्न नाही. तुम्हीच आमच्या पायावर पाय देऊ नका, तुम्ही वयानं मोठे आहात. भान ठेवून बोला. यांना राज्यात शांतता ठेवायची नाही,” असा पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर केला आहे.
 
भुजबळांचं आता वय झालं आहे. आता आम्ही भुजबळांना महत्त्व देणार नाही, असंसुद्धा जरांगे पुढे बोलले आहेत.
 
मराठा आणि ओबीसींमध्ये कुठलाही वाद नसल्याचं जरांगे यांनी म्हटलंय.