शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (22:22 IST)

तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला”, चित्रा वाघ यांचे ट्वीट

मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलाय.  त्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही या आरोपांवरुन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधलाय. 
 
“तुम्ही…त्याला धमक्या दिल्या, त्याला अपमानीत केलं, त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या, त्याच्या बहिणीवर आरोप केले, त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं, त्याचा जात धर्म काढला… तरीही तो डगमगला नाही, कर्तव्य बजावत राहीला… तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला” असं ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोपींवर नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
 
दरम्यान, चित्रा वाघ यांनी ट्विटरवर आपला एक व्हिडीओ पोस्ट करुन मी क्रांती रेडकर सोबत असल्याचं जाहीर केलंय. “आर्यन खानच्या पाठीशी बॉलिवूडसह सरकार उभं राहिलं, तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर अभद्र भाषेत टीका सुरू आहे,” असा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. तसेच मी महिला म्हणून अभिनेत्री क्रांती रेडकरसोबत आहे, असंही त्यांनी जाहीर केलं.
 
चित्रा वाघ म्हणाल्या, “काय जमाना आहे, आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं, तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर अभद्र भाषेत टीका सुरू आहे. जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं. क्रांती, महिला म्हणून मी तुझ्यासोबत आहे.”