बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जानेवारी 2024 (09:24 IST)

महाराष्ट्राच्या वतीने प्रजासत्ताक दिनी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर होणार

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर होणाऱ्या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील 16 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश चित्ररथ पथसंचलनात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राच्या वतीने देखील यंदा चित्ररथ सादर करण्यात येणार आहे. 
 
महाराष्ट्राच्या वतीने प्रजासत्ताक दिनी मिरवणुकीसाठी 'भारतीय लोकशाहीची प्रेरणा: छत्रपती शिवाजी महाराज' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात येणार आहे.
 
यंदा योगायोगाने शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष असल्याने त्याच अनुषंगाने ‘लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर संरक्षण मंत्रालयास चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले.
 
माहितीनुसार प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमासाठी देशभरातून एकूण 30 राज्यांनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी अर्ज केला होता. विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांच्या चित्ररथांची निवड करण्यात आली आहे.
 
दिल्ली केंट राष्ट्रीय रंगशाला परिसरात शुभ ॲड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे. भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील 16 कलाकारांच्या चमूच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहेत. भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव करणाऱ्या ‘धन्य शिवराय… धन्य महाराष्ट्र !’ गीताची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे.
 
चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास अर्थातच त्यांच्या बालपणापासून ते राज्याभिषेक दिवसापर्यंतचा प्रवास दाखवला जाईल.