बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जानेवारी 2024 (08:53 IST)

३ रा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल

जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी जळगावात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे होत आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उत्साह शिगेला पोहोचला आहे.चित्रपट विषयक प्रदर्शनी , शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, टुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह उद्घाटन व समापन सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे.
 
यंदा या महोत्सवाचे ३रे वर्ष असून खान्देश व मराठवाडा क्षेत्रासह संपूर्ण राज्यातून या महोत्सवासाठी १०० हून अधिक शॉर्टफिल्म सहभागी झाल्या आहेत. तज्ञ परिक्षकांमार्फत परिक्षण करुन यातील निवडक ६० शॉर्ट फिल्मचे अधिकृत प्रदर्शन या दोन दिवसीय महोत्सवात करण्यात येणार आहे त्यामुळे जळगावकर नागरिकांना विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण लघुपट, माहितीपटांची मेजवानी मिळणार आहे.
 
या महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील अनेक गणमान्य कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक युवा कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवस उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण परिसराला चित्रतपस्वी भालजी पेंढारकर चित्र नगरी असे नाव देण्यात आले आहे तर स्क्रिनींग सभागृहांना पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे व पद्मश्री ना.धों.महानोर यांचे नाव देण्यात आले आहे.
महोत्सवाची ओपनिंग फिल्म बिसाउ कि मुक रामायण दि.२७ जानेवारी रोजी स ९:०० वा.डॉ. प्रभा अत्रे सभागृहात प्रदर्शित करण्यात येईल या नंतर महोत्सवात सहभागी निवडक ६० चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. दुपार सत्रात चित्रपट रसिकांसाठी ‘चित्रपट रसग्रहण’ या विषयावर भारतीय चित्र साधनाचे राष्ट्रीय सचिव, चित्रपट अभ्यासक अतुल गंगवार , दिल्ली यांचा मास्टर क्लास होणार आहे तर तरुणांसाठी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, पुणे यांचा ‘कथा निवड व दिग्दर्शन’ या विषयावर मास्टर क्लास होईल.
 
सायंकाळी ४:३० वा.कुलगुरू डॉ.व्हि.एल.माहेश्वरी, अशोकभाऊ जैन, डॉ. भरतदादा अमळकर, चित्रपट अभ्यासक अतुल गंगवार,दिल्ली. अभिनेत्री सुरभी हांडे इ.मान्यवरांच्या उपस्थितीत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य उद्घाटन सोहळा होईल. सायंकाळी ७ वा.टुरींग टाकीज या सत्रात लहान मुलांचे भावविश्व समृद्ध करणारा चित्र आर्या – द डाँटर आँफ भारत चे प्रदर्शन तसेच निर्माता दिग्दर्शक यांचेशी खुला संवाद कार्यक्रम होणार आहे.