बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जानेवारी 2024 (08:46 IST)

शरद पवार यांनी कधीही राजीनामा दिलेला नव्हता

Jayant Patil
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्योसमोर युक्तीवाद सुरू आहे. आज (ता. 24 जानेवारी) अजित पवार गटाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उलटसाक्ष घेण्यात आली. या उलट साक्षीमध्ये दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला.
 
जयंत पाटील यांना अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना पाटलांनी उत्तरे देत एक मोठा खुलासा केला आहे. शरद पवार यांनी कधीही राजीनामा दिलेला नव्हता, परंतु, त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. ज्यावेळी त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली, तेव्हा लोक त्यांची निवृत्ती स्वीकारण्यास तयार नव्हते, असे जयंत पाटील यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. तर, जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असल्याचा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. तर मी निवडून आलोय, प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचे पत्र प्रफुल पटेल यांनी पाठवले होते, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांच्याकडून या युक्तीवादादरम्यान देण्यात आले आहे. यावेळी अजित पवार गटाच्या वकिलांकडून जयंत पाटील यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.
 
तुम्ही तुमच्या पुराव्याच्या प्रतिज्ञापत्राच्या परिच्छेद 52(Ill) मध्ये केलेले विधान कोणत्या दस्तऐवजावर आधारित आहे? असा प्रश्न अजित पवार गटाच्या वकिलांकडून विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी प्रत्यक्ष राजीनामा दिला नाही म्हणून कोणतेही कागदपत्र नाही. तेही त्यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात जाहीर केले होते. तर, 11 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्य समितीच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यासाठी कोणतेही प्राधिकार जारी करण्यात आले होते का? असा प्रश्न वकिलांनी उपस्थित केला असता जयंत पाटील म्हणाले की, होय, मी प्रतिनिधींची यादी बनवली आहे आणि ती राष्ट्रीय निवडणूक अधिकारी पितांबरन यांना पाठवली आहे.