लातूर येथे महा स्वच्छता अभियान
अलिबागच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या साडेपाच हजार कार्यकर्त्यांनी लातुरात शहर स्वच्छ करुन टाकलं आहे. पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर ही मोहीम राबवली जात आहे. शासनाने त्यांची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली आहे.
जिल्हा परिषद, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी चौक, दयानंद गेट, शिवाजीनगर पोलिस स्टेशन, पोलिस अधीक्षक कार्यालय, खोरी गल्ली, अंबाजोगाई मार्ग, मध्यवर्ती बस स्थानक, शासकीय रुग्णालय, मिनी मार्केट, गांधी चौक, हनुमान चौक, बाजार पेठ, गंजगोलाई, टाऊन हॉल मैदान यासह अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेसाठी साडेपाच हजार कार्यकर्त्यातून आठ पथके तयार करण्यात आली होती. जाईल त्या भागात शिस्तीत आणि शांततेत स्वच्छता करणारे कार्यकर्ते दिसत होते. हातमोजे, गमबूट, मास्क, झाडू आणि इतर साहित्य घेऊन हे कार्यकर्ते मनोभावे सेवा करीत होते.
या कार्यकर्त्यांमध्ये मजूर, शेतकरी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते, व्यापारी, सरकारी अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील १४८ शहरांमध्ये १४३४ सरकारी कार्यालये, ११५ रेल्वे स्थानके, २७२० कोलिमीटरचे रस्ते स्वच्छ करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अॅड. उमेश भोंजने यांनी दिली.