सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (21:13 IST)

करुणा मुंडे यांनीच पक्ष काढण्यासाठी 34 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार

karuna sharma munde
करुणा शर्मा-मुंडे यांनी फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर संगमनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, आता करुणा मुंडे यांनीच पक्ष काढण्यासाठी 34 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली असून याप्रकरणी मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी गुन्हा दाखल झालेल्या भारत भोसले यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
 
करुणा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील भारत भोसले यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आपल्यावरील आरोप खोटा असून, आपलीच फसवणूक झाली असल्याचे भारत भोसले यांनी म्हटले आहे. त्यांनी मागील महिन्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. मात्र, तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल केला नव्हता. त्यानंतर भोसले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे सादर केली. यानंतर मुंडे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
भोसले यांची करुणा मुंडे यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर मुंडे यांनी नवीन पक्ष काढण्यासाठी व पक्षबांधणीसाठी भोसले यांच्याकडून 4 लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर पुन्हा त्यांनी 36 लाख रुपये मागितले. त्यावेळी भोसले यांनी त्यांच्याकडील आणि त्यांचे मित्र बालम शेख यांच्याकडील 24 तोळे सोने करुणा मुंडे यांना दिले. त्यावेळी मुंडे यांनी पक्षाची नोंदणी झाल्यानंतर पक्षाकडे पैसा जमा झाल्यानंतर पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच त्यानंतर पक्ष बांधणीसाठी एकूण 40 लाख रुपये लागत असल्याचे सांगितले. त्यानुसार भोसले यांनी 22 लाख 45 हजार रुपये रोख रक्कम व 12 लाख रुपयांचे सोने मुंडे यांना दिले.