कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन लागू
सांगलीपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.
करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि प्रसार नियंत्रित व्हावा, यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा परिणाम विषाणू प्रसाराला आळा घालण्यावर होत नसल्याचं चित्र आहे. राज्यातील रुग्णावाढीचा आलेख कायम असून, ५० ते ६० हजारांच्या दरम्यान राज्यात रुग्णवाढ होत आहे. यात काही जिल्ह्यांतील परिस्थिती अजून चिंताजनक आहे. जिल्ह्यात वाढती करोना रूग्णसंख्या पाहता बुधवारपासून (५ मे) पुढील १० दिवस कडकडीत टाळेबंदी पाळण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्ह्यात वाढणारी करोना रूग्णसंख्या आणि त्याप्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची भासणारी कमतरता पाहता दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे सहभागी झाले होते. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये रूग्णसंख्या वाढत राहिली, तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. विषाणूची साखळी तोडण्यासाठी उद्यापासून जिल्ह्यात कडकडीत टाळेबंदी लागू केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.