'राणा दाम्पत्यात कॉंग्रेसला रस नाही'नाना पटोले यांची राणा दाम्पत्यावर टीका
नागपूर - भाजप खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना हनुमान चालीसा पठन करावेसे वाटत असेल तर आणि फक्त हाच प्रश्न महत्वाचा आहे असे वाटत असेल तर यात कॉंग्रेसला काहीही रस नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते नागपूर विमातळावर माध्यमांशी बोलत होते.
जेलवारी केल्यानंतर तब्बल 36 दिवसानंतर राणा दाम्पत्य नागपूरमध्ये येत आहेत. कार्यकर्ते त्यांचे जंगी स्वागत करणार आहेत. त्यानंतर नागपूरच्या रामनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार आहेत. याविषयी नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, मी हिंदू धर्माचा आहे. वारंवार सांगतो मी हनुमान चालीसा घरी वाचतो. आमचा धर्म आमच्या आस्थेचा विषय आहे. मला राणा दाम्पत्याबद्दल कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. तो आमचा विषय नाही. आम्ही धर्माचा आदर करतो, त्याची जाहिरात करत नाही.
तसेच, केंद्र सरकारने आठ वर्षात देश विकून देश चालवण्याचे काम केले आहे. देशाचे संविधान बद्दलवण्याचे काम चालू आहे. बेरोजगारी, महागाईच्या कचाट्यातून जनता बाहेर पडत नसताना हे सगळे प्रश्न असताना राणा दाम्पत्यात कॉंग्रेसला रस नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, सध्या अणखी एक विषय गाजतो आहे तो म्हणजे पोलिसांच्या बदल्या. पोलीस बदल्यांच्या यादीवर बोगस, वाळू तस्कर, गुड, बरा असा शेरा असल्याचा एक्सक्लुझिव्ह अहवाल 'लोकशाही' न्यूजच्या हाती लागला आहे. जालना जिल्ह्यातील (Jalana) विविध ठाण्यांसह शाखांतून मागील वर्षी 180 पोलिस (Police) कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यातील काही बदल्या लोकप्रतिधी, गुत्तेदारांच्या शिफारसीवरून झाल्या असल्याचे समजते आहे. यावर नाना पटोले यांनी सर्व विभागातील बदल्यांना स्थगिती दिलेली आहे, असे स्पष्ट केले आहे.