बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (08:20 IST)

काँग्रेस गाजावाजा करत नाही, प्रत्यक्ष मदत करते – नाना पटोले

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यावर भर देण्यापेक्षा थेट मदत प्रत्यक्ष पोहचवण्यावरती काँग्रेस पक्षाचा भर आहे.
 
पुण्यातील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या पुढाकारातून शहर काँग्रेसतर्फे सांगली कोल्हापूर या भागातील पुरामुळे बाधित नागरिकांना मदत पाठविण्याचा कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी असून साऱ्या महाराष्ट्रातूनच या पूरग्रस्त भागांमध्ये मदत पाठवली जात आहे त्याचा श्री गणेशा पुण्यात आबा बागुल यांच्या पुढाकाराने होत आहे. ही आनंदाची बाब आहे. असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी काढले. सारसबाग येथे झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.
 
नाना पटोले म्हणाले की, अश्या नैसर्गिक संकटाच्यावेळी धावून जाण्यात काँग्रेसचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करणे,नुकसानीचा अंदाज घेणे हे शासकीय पातळीवर आवश्यकच आहे. मात्र काँग्रेस पक्षाने केवळ पाहणीवर भर न देता थेट मदत करण्यावर भर दिला असून या पूरग्रस्त भागातील नागरिकांना आधार देण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे. यापूर्वीही काँग्रेस पुरग्रस्तांच्या मदतीला सदैव धावून आली आणि पुढेही राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
सारसबाग येथे तीन ट्रक भरून पूरग्रस्तांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम त्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवला त्याप्रसंगी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक अविनाश बागवे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
 
याप्रसंगी संयोजक आबा बागुल म्हणाले की, नैसर्गिक अपत्तीवेळी मदतीला धावून जाणं यात आम्ही सदैव पुढाकार घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी देखील सांगली कोल्हापूर भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हाही मोठी मदत केली होती.आताही करत आहोत आता ही मदत गोळा करून जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांच्याकडे न देता आम्ही थेट नागरिकांना वाटणार आहोत त्यामुळे ती सत्वर मदत मिळेल. तसेच नैसर्गिक आपत्ती आली की मदतीला धावून जाणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. याच बरोबर अति मुसळधार पाऊस पडणं त्यातून नद्यांना पूर येणं त्यातून मोठी वित्तहानी होणं आणि नागरिकांना जीव गमवावा लागणं हे वर्षानुवर्षे चालू आहे. हे रोखण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून अनेक तज्ज्ञ टाऊन प्लॅंनर यांच्याशी चर्चा करून या संपूर्ण कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील भागांचे सर्वेक्षण करून पुन्हा असा मोठा पाऊस झाला तर निर्माण होणाऱ्या परिस्थितून पूर येऊ नये जरी पूर आला तरी गावांचे, शहरांचे, नागरिकांचे नुकसान होऊ नये. यासाठी प्रतिबंधात्मक काही उपाययोजना करता येईल याचा मास्टर प्लॅन तयार करण्याचा आम्ही संकल्प केला असून लवकरच त्याचे काम रू होत असून महाराष्ट्र शासनाला त्याचा अहवाल सादर करणार आहोत. अश्या प्रतिबंधात्मक उपाययोजनामुळे यापुढे अश्या आपत्तीतून होणारे नुकसान टळेल असे आबा बागुल म्हणाले.
 
हे मदत कार्य सांगलीतील शिरोळ, आलास, बुबनाळ, कुरुंदवाड येथे तीन दिवसांत थेट वाटप करण्यात येणार असून त्यामध्ये 2000 रेशन किट (साखर,चहापत्ती,मीठ,हळद,लाल तिखट,तांदूळ,साबण,डाळ),1000 ब्लॅंकेट, 2000 सोलापूरच्या भाकरी व चटणी, 1000 साड्या,3000 मास्क,1000 सॅनिटायजर आदी साहित्य आहे. सोबत सुमारे 50 कार्यकर्ते असून हे कार्यकर्ते मदत वाटपात सहभागी होणार आहेत शिवाय तेथील गावकऱ्यांवरती ताण येऊ नये यासाठी हे कार्यकर्ते स्वतःचे जेवण स्वतःच बनवणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणतीही जबाबदारी पडू नये याची खबरदारी देखील त्यांनी घेतली आहे.याचा बरोबर सोबत झाडू,फावडे,घमेली आदी साहित्य सोबत घेतले असून पूरग्रस्त भागांतील कचरा गाळ काढण्यात येणार असून स्वच्छता करण्याचे कामही हे कार्यकर्ते करणार आहेत.